गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:08 PM2024-09-27T13:08:41+5:302024-09-27T13:09:09+5:30

बांबवड्याच्या दोघांचे कायमस्वरूपी ऐकणे झाले बंद

30 youths of Kolhapur lost their ears due to the noise of the Ganesh Visarjan procession | गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील दणदणटामुळे कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ३० हून अधिक तरुणांचे कान बाद झाले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील दोघांना ऐकू येणे कायमस्वरूपी बंद झाले आहे. आता याबाबत सर्व डॉक्टरांकडून माहिती संकलित करण्याचा निर्णय कान, नाक, घसातज्ज्ञांच्या संघटनेने घेतला आहे.

विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणा हा आता चिंतेचा विषय झाला आहे. लेझरमुळे काही जणांच्या डोळ्यांतून रक्त आल्यामुळे नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर बंदी आणली होती; परंतु रात्री १२ ला जरी ध्वनी यंत्रणा बंद झाली असली तरी त्याआधी तरुण मंडळांनी एकावर एक थर चढवत आपली आवाजाची हौस भागवून घेतील होती; परंतु यामध्ये अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांचेच कान बाद झाले आहेत.

बांबवडेजवळील पाटणे येथील एक युवक कानाला ऐकू येईनासे झाल्यानंतर १२ तासांत डॉक्टरांकडे आला. त्याच्या पडद्याला इंजेक्शन देण्यात आले आणि त्यातून त्याला ५० टक्के ऐकू येऊ लागले; परंतु दुसरा इंजिनिअर असलेला २१ वर्षांचा युवक दोन दिवसांनी डॉक्टरांकडे आला. त्यामुळे उपचारावर मर्यादा आल्याने त्याला दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. तो ध्वनी यंत्रणेला पाठ लावून बसला होता. बांबवडे येथील तिसऱ्या युवकाची ऐकण्याची क्षमता ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.

अधिक माहिती घेतली असता कोल्हापूरमधील एका कानाच्या डॉक्टरकडे हे दहाजण दाखल झाले होते. असे ३५ जण शहरात असून आता त्यांच्याकडून कोणाच्या दवाखान्यात कितीजण दाखल झाले होते, याची माहिती घेतली जात आहे. संघटनेने हा उपक्रम हातात घेतला असून, त्या आकडेवारीच्या आधारे जनजागरण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. राजश्री माने आणि डाॅ. अजित लोकरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील संख्याही अधिक

मोठी ध्वनी यंत्रणा केवळ शहरात लावली जाते हा गैरसमज आहे. दाखल १० रुग्णांपैकी सातजण हे ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये वाघापूर (ता. भुदरगड), हासूर दुमाला (ता. करवीर), कळे सातवे (ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, अयोध्या कॉलनी येथील युवकांचा एक कान बरा असून, दुसऱ्या कानाची ऐकण्याची क्षमता ५० टक्क्यांहून कमी झाली आहे.


नेहमीपेक्षा कानावर मोठा आवाज आणि तो अधिक काळ आदळला तर त्यामुळे कानाच्या पडद्याला दुखापत होते. संबंधित व्यक्ती जर २४ तासांत डॉक्टरकडे आली तर इंजेक्शन देऊन उपचार करता येतात. २४ तासांपेक्षा अधिक काळ झाला तर मात्र उपचारावर मर्यादा येतात. माझ्याकडे आलेले बहुसंख्य रुग्ण मिरवणूक झाल्यानंतर तीन, चार दिवसांनी आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना मर्यादा आल्या आहेत. - डॉ. वासंती पाटील, कर्ण उपचार तज्ज्ञ

Web Title: 30 youths of Kolhapur lost their ears due to the noise of the Ganesh Visarjan procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.