कस्तुरी सावेकरसह ३०० गिर्यारोहक खडतर बेसकॅॅम्प दोनवरच थांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:16+5:302021-05-29T04:19:16+5:30
कोल्हापूर : बर्फवृष्टी आणि वेगाने वाहणारे वारे कायम असल्याने सलग दुसऱ्या शुक्रवारी कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिच्यासह अन्य ३०० गिर्यारोहक ...
कोल्हापूर : बर्फवृष्टी आणि वेगाने वाहणारे वारे कायम असल्याने सलग दुसऱ्या शुक्रवारी कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिच्यासह अन्य ३०० गिर्यारोहक खडतर अशा बेसकॅॅम्प दोनवरच थांबून आहेत. आज, शनिवारी सायंकाळपर्यंत वेदर विंडो मिळेल आणि आपण ‘मिशन एव्हरेस्ट’ पूर्ण करू या आशेने ते या ठिकाणी थांबले आहेत.
कॅॅम्प दोनवरील वातावरण अद्याप बदलले नाही. बर्फवृष्टी आणि प्रचंड वेगाने वारा वाहत असल्याने तेथील शेर्पा आणि गिर्यारोहकांना दहा फुटांहून अधिक अंतरावरील काही दिसत नाही. बर्फवृष्टीमुळे सॅॅटेलाईट फोनदेखील काम करेना झालेत. या कॅॅम्पवरून खाली आणि वरदेखील जाता येत नाही. या परिस्थितीचा धीर आणि संयमाने सामना करत आहेत. या कॅॅम्पवरील धान्य, इंधन संपत आले असून गिर्यारोहकांच्या संस्थां एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. आज, शनिवारी सायंकाळनंतर वेदर विंडो मिळेल असा अंदाज आहे. त्यानंतर सर्व गिर्यारोहकांची सुरक्षितता विचारात घेऊन तेथील तज्ज्ञ शेर्पा पुढील निर्णय घेणार असल्याचे कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी शुक्रवारी सांगितले.
चौकट
जखमी शेर्पाला बेसकॅॅम्पवरून उतरविण्यात यश
दोन दिवसांपूर्वी एक शेर्पा कॅम्प दोनवर गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराची गरज होती. त्याला कसेतरी करून शुक्रवारी सकाळी बेसकॅम्पला उतवरण्यात इतर शेर्पांना यश आले आहे. त्याच्यासाठी लुक्लाहून एक हेलिकॉप्टर बेसकॅम्पवरून त्याला घेऊन गेले. बर्फवृष्टीमुळे हेलिकॉप्टरदेखील उड्डाण करू शकत नाही.