कारखान्यांकडे ३०० कोटी थकीत

By admin | Published: October 4, 2015 11:20 PM2015-10-04T23:20:13+5:302015-10-05T00:12:45+5:30

दुसऱ्या हप्त्याचे ३८० रुपये बुडविले : हंगाम २00६-0७; ९०० व ३८० अशा दोन हप्त्यांत १२८० रुपये देण्याचा फॉर्म्युला होता

300 crore tired of factories | कारखान्यांकडे ३०० कोटी थकीत

कारखान्यांकडे ३०० कोटी थकीत

Next

प्रकाश पाटील -- कोपार्डे --साखरेचे दर घसरल्याने एफआरपी तीन टप्प्यांत देण्यासाठी सूट मिळावी असा ठराव साखर कारखानदारांनी वार्षिक सभेत करण्यास सुरुवात केली आहे. त्याला शेतकरी संघटनांंनी विरोध केला आहे. याला २००६-०७ च्या हंगामातील दोन हप्त्यांतील ऊसदर कारणीभूत आहे. कारण या हंगामातील कागलचा ‘शाहू’ कारखाना वगळता सर्वच कारखान्यांनी दुसरा हप्ताच दिला नाही. ही रक्कम जवळजवळ ३०० कोटी असून, ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
हंगाम २००६-०७ मध्ये साखरेचे दर पडले होते. या हंगामातही शेतकरी संघटनांनी एकरकमी ऊसदरासाठी आंदोलन उभे केले होते. राजू शेट्टी यांनी १४०० रुपये प्रतिटन, तर रघुनाथदादा पाटील यांनी १८०० रुपये प्रतिटन एकरकमी ऊसदर मिळाल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे हंगाम सुरू होण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता दिसताच तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी खा. राजू शेट्टी यांना बरोबर घेऊन आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या. यातून १२८० रुपये प्रति मे. टन ऊसदर ठरविण्यात आला. मात्र, साखरेचे दर घसरल्याने तो एकरकमी देण्याऐवजी दोन हप्त्यांमध्ये देण्याचा करार यावेळी करण्यात आला.
यामध्ये पहिला हप्ता ९०० रुपये व दुसरा हप्ता ३८० रुपये असा ९०० + ३८० = १२८० चा फॉर्म्युला होऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासमोर खासदार शेट्टी, माजी खासदार मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे व जिल्ह्यातील कारखानदारांत करार करून हंगाम सुरळीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. खा. शेट्टी यांनी हंगाम लांबत चालल्याने कारखानदारांबरोबर शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ नये यासाठी ताठर भूमिका सोडून कारखानदारांना ९०० + ३८०= १२८० प्रमाणे ऊसदर देण्यास मुभा दिली. या फॉर्म्युल्याला रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने विरोध केला होता. मात्र, कारखाने सुरू झाल्यानंतर त्यांनीही मवाळ भूमिका घेतली.
हंगाम २००६-०७ मध्ये गाळप हंगाम पूर्ण होताच साखर कारखानदारांनी आपली भूमिका बदलली. पहिला ९०० रुपयेचा प्रतिटन हप्ता सर्वच कारखानदारांनी दिला, मात्र ३८० ची दुसऱ्या हप्त्यापोटीची रक्कम आजअखेर थकीतच आहे. ही रक्कम ३०० कोटींच्या घरात आहे. छ. शाहू-कागलने मात्र ९०० + ३८० = १२८० ही पूर्ण रक्कम आपल्या ऊस उत्पादकांना दिली आहे. यानंतर याबाबत ना शासनाने, ना कारखानदारांनी, ना शेतकरी संघटनांनी आवाज उठविला आहे. हा अनुभव लक्षात घेऊनच अलीकडच्या काळात एफआरपी एकरकमी मिळावी यासाठी शेतकरी संघटना आग्रह करीत आहे. एफआरपीचा कायदा हा केंद्रीय कृषी मंत्रालय व कृषिमूल्य आयोग यांनी बनविला आहे. यामध्ये शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ कलम ३ (ए) नुसार शेतकऱ्याचा ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत त्याचा एफआरपीप्रमाणे सर्व ऊसदर एकरकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग झाला पाहिजे, असा कायदा आहे.


अजूनही थकबाकी
हंगाम २००६/०७ मध्ये ९०० व ३८० चा दोन हप्त्यांचा ऊसदर देण्याचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी माजी खासदार कै. मंडलिक व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती; मात्र मंडलिक कारखान्याने १९ कोटी ८१ लाख ३७ हजार ३२०, तर आवाडे यांच्या ‘जवाहर’ने ४४ कोटी ५९ लाख ९६ हजार ८८० रुपये अशी दुसऱ्या हप्त्यापोटी द्यावी लागणारी ३८० ची रक्कम अद्यापही दिलेली नाही. वारणा कारखान्याकडे सर्वांत जास्त ४७ कोटी ७१ लाख ५८ हजार २० रुपये थकीत आहेत.
केंद्राच्या कायद्यात बदल करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यांना नाही. एफआरपीचा कायदा केंद्राने बनविला असून, तो शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून केला आहे. सध्या एफआरपी तीन हप्त्यांत देऊ असा नारा कारखानदार करीत आहेत; मात्र २००६-०७ चा अनुभव पाहता कारखानदार पुन्हा लबाडी कशावरून करणार नाहीत? ज्या कारखानदारांनी दोन खासदार, एक आमदार, जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या कराराला केराची टोपली दाखवत ३०० कोटी लाटले, त्यांच्यावर काय भरवसा? आमची भूमिका एकरकमी एफआरपीचीच राहील. यासाठी आपण रस्त्यावर उतरू.
- पी. जी. पाटील (अध्यक्ष, रघुनाथदादा शेतकरी संघटना, कोल्हापूर जिल्हा)

२००६-०७ मधील ३८० च्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे थकीत रक्कम पुढीलप्रमाणे :
कारखान्याचे नाव२००६-०७ मध्ये ३८० ची थकीत
गाळप ऊस मे. टन रक्कम (कोटी)
भोगावती, परिते५,४५,७२४२०,७३,७५,१२०
मंडलिक, हमीदवाडा५,२१,४१४१९,८१,३७,३२०
जवाहर, हुपरी११,७३,६७६४४,५९,९६,८८०
दुधगंगा-वेदगंगा, बिद्री६,४२,९००२४,४३,०२,०००
तात्यासाहेब कोरे, वारणा१२,५५,६७९४७,७१,५८,०२०
छ. राजाराम, बावडा३,७५,३४६१४,२६,३१,४८०
दत्त, शिरोळ१०,२५,२८०३८,९६,०६,४००
पंचगंगा, इचलकरंजी६,४३,१९३२४,४४,१३,३४०
शरद, नरंदे४,१४,७३३१५,७५,९८,५४०
डी. वाय. पाटील, पळसंबे३,५५,१५३१३,४९,५८,१४०
दत्त, आसुर्ले-पोर्ले१,३१,०००४,९७,८०,०००
गडहिंग्लज, हरळी३,७८,३३२१४,३७,६६,१६०
कुंभी-कासारी, कुडित्रे५,१४,१६२१९,५३,८१,५६०
गुरुदत्त, टाकळी५,६९,९८०२१,६५,९२,४००
दौलत, चंदगड५,१७,६९५१९,६७,२४,१००
उदयसिंह गायकवाड, बांबवडे१,९६,२६३७,४५,७९,९४०

फॉर्म्युला
खा. राजू शेट्टी, माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, माजी आ. प्रकाश आवाडे यांनी फॉर्म्युला तयार करून कारखानदारांबरोबर केला होता करार.

Web Title: 300 crore tired of factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.