मलकापूर : अणुस्करा मार्गासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर तीन जिल्ह्यांतील रस्ता : नोव्हेंबरमध्ये प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:10 AM2018-09-20T00:10:28+5:302018-09-20T00:11:19+5:30
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर
राजाराम कांबळे-
मलकापूर : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा राज्यमार्ग ‘हायब्रीड अॅन्युईटी’ या तंत्रज्ञानाने बनविला जाणार आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनधारक यांना सोयीचा राज्यमार्ग म्हणून उदयास येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांच्या राजापूर, शाहूवाडी, शिराळा व वाळवा तालुक्यातून अणुस्कुरा, विटा, पेठ हा राज्यमार्ग गेला आहे. हा राज्यमार्ग १३५ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर नऊ किलोमीटरचा यु आकाराची वळणे असलेला सर्वांत मोठा घाट आहे, तर सर्वांत लहान अमेणी घाट आहे. चार तालुक्यांच्या हद्दीतून हा राज्यमार्ग गेला आहे. रस्त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडरदेखील प्रसिद्ध केले आहे. पन्हाळा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम केले जाणार आहे. एकाच कंपनीला काम दिल्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहणार आहे.
या रस्त्याच्या कामासाठी विटा पेठ ते कोकरूड रस्त्यासाठी १९३ कोटी तर कोकरूड, अणुस्कुरा, पाचलपर्यंत १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा रस्ता हायब्रीड अॅन्युईटी या तंत्रज्ञानाने बनावला जाणार आहे. रस्त्यासाठी नवीन संकल्पना वापरली जाणार आहे. सात मीटर रुंदीचा होणार आहे. रस्त्याच्या काही ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे रस्ता खचून खड्डे पडतात, बारमाई पाणी झिरपत असते अशा ठिकाणी मोठा भराव टाकून रस्ता मजबूत केला जाणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील अमेणी फाटा, तुरूकवाडी, पेरीड (घागर दरा), अमेणी घाट अशा ठिकाणी पाण्याचे स्रोत असल्यामुळे रस्ता लवकर खराब होतो.
या राज्यमार्गाच्या रस्त्याचे काम करतेवेळी कोकरूड, मलकापूर बाजारपेठेतून हा रस्ता गेला आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी आहे अशा ठिकाणी रस्ता सात मीटर रुंदीने केला जाणार आहे. २००० साली रस्त्याचे रुंदीकरण झाले होते. सांगली जिल्ह्यातून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडे तोडली जाणार आहे. ज्या ठिकाणी अपूर्ण कमी रुंदी आहे तेथे रस्ता मोठा केला जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर दळणवळणाला चालना मिळणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांना गोवा व कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग होणार आहे. कोकणातील प्रवाशांना पुणे, मुंबई येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.
रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास शाहूवाडी, शिराळा तालुक्यातील चाकरमान्यांना मुंबईला लवकर जाता येणार आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा वाढणार आहे. कोकणातील जयगड बंधरातून या मार्गावरून कोळशाची मोठी वाहतूक केली जाते. वाहनधारक, प्रवासी यांना हा मार्ग सुखकर होणार आहे. विटा, पेठ, कोकरूड, मलकापूर, अणुस्कुरा, साटवली, पाचलपर्यंत सहहकाम केले जाणार आहे.
अणुस्कुरा घाटाचे रूंदीकरण होणार
अणुस्कुरा घाटाचे रुंदीकरण केले जाणार आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती, तारेचे कुंपण, लोखंडी बॅरेकेटस उभारली जाणार आहेत. या मार्गावरून सध्या चार चाकी व अवजड वाहनांची नेहमी गर्दी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाºया जमिनीची किमती गगनाला भिडणार आहेत. या रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.