Kolhapur: महाप्रसादातून शिवनाकवाडीत ७०० जणांना विषबाधा, रुग्णांवर उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:22 IST2025-02-05T17:16:07+5:302025-02-05T17:22:10+5:30

गणपती कोळी  कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ ) येथे यात्रेतील महाप्रसादातून आज, बुधवारी सुमारे ७०० हून अधिक लोकांना विषबाधा ...

300 people poisoned in Shivnakwadi Kolhapur district from Mahaprasad | Kolhapur: महाप्रसादातून शिवनाकवाडीत ७०० जणांना विषबाधा, रुग्णांवर उपचार सुरु

Kolhapur: महाप्रसादातून शिवनाकवाडीत ७०० जणांना विषबाधा, रुग्णांवर उपचार सुरु

गणपती कोळी 

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे यात्रेतील महाप्रसादातून आज, बुधवारी सुमारे ७०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली. गंभीर रुग्णांवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

आरोग्य विभागाने महाप्रसादातील पदार्थ व पाणी तपासण्यासाठी पाठविले असून रुग्णांना तातडीचे उपचार करण्यासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक आरोग्य  कर्मचारी, अधिकारी सेवा देत आहेत. उपचारासाठी रुग्णांसह नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

गावचे ग्रामदैवत कल्याणताई देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने काल, मंगळवारी दुपारी खिरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. मात्र मध्यरात्रीनंतर काही नागरीकांना उलटी, जुलाबाचा त्रास होत असल्याने प्रारंभी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेत होते. मात्र ही संख्या वाढत असल्याने विषबाधा झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. 

विषबाधाची घटना समजताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्रीय करुन रुग्णावर उपचार सुरु केले. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात येत होते. तसेच आरोग्य विभागाचे तीन पथके घरोघरी जाऊन विषबाधेतील रुग्णांची माहिती घेत होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. 

तालुका वैद्यकीय अधिकारी खटावकर उपचाराबाबत नियोजन करत होते. दुपारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी रुग्णांची भेट घेतली. तसेच जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, तहसीलदार अनिल हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जि.प. माजी सदस्य विजय भोजे, पृथ्वीराज यादव यांच्यासह राजकीय नेत्यांनी भेट देवून रुग्णांसह नातेवाईकांना धीर देत होते.

Web Title: 300 people poisoned in Shivnakwadi Kolhapur district from Mahaprasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.