सहलीसाठी ३०० एस.टी.बस
By admin | Published: December 7, 2015 11:55 PM2015-12-07T23:55:27+5:302015-12-08T00:43:43+5:30
प्रवास स्वस्त : सेवा करातील सूटचा शाळांना फायदा
कोल्हापूर : राज्य शासनाने शालेय सहलींच्या सेवाकरात सूट दिल्याने यंदापासून शालेय सहली पालकांच्या बजेटमध्ये उरकणार आहेत. याचा लाभ जास्तीत शाळांनी घ्यावा, यासाठी एस. टी. महामंडळही सरसावले आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या वतीने शाळा व महाविद्यालयीन सहलीसाठी ३०० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
शाळांतील चार भिंतींच्या आतील शिक्षणाबरोबर व्यावहारिक जगाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, शैक्षणिक सहलीला एस.टी.नेच जा, असा सल्ला शिक्षण विभाग देत असला तरी अशा सहलींसाठी खासगी आरामगाड्यांना शाळांकडून दिली जाणारी पसंती हा चिंतेचा विषय बनली आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवर डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत या सहलींचे आयोजन करण्यात येते. शाळेच्या सहलीसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून परवानगी घेतली जाते. सहलीसाठी एस. टी. बस असल्याशिवाय परवानगीच दिली जात नाही. मात्र, काही शाळा खासगी वाहनांना पसंती देतात. यासाठी शैक्षणिक विभागातर्फे कडक पावले उचलण्याची गरज आहे.
शालेय सहलीसाठी महामंडळाच्या वतीने पन्नास टक्के सवलत दिली जाते. तसेच आता सेवाकरात १२.३६ टक्के सूट दिल्याने सहल आवाक्यात येणार आहे.
सुरक्षित व नियोजनपूर्वक गाड्यांसाठी शाळांनी एस.टी.चा लाभ घ्यावा. गत दोन वर्षांत शालेय सहलीसाठी १ हजार ८७ एस. टी. गाड्यांचे बुकिंग केले होते. यंदा सेवाकर कमी केल्याने शाळांना किमान एका दिवसाला पाचशे रुपये कमी खर्च द्यावा लागणार आहे. त्याचा लाभ शाळांनी घ्यावा.
- अभय कदम, स्थानकप्रमुख,
मध्यवर्ती बसस्थानक
सहलीसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून परवानगी
काही शाळा खासगी वाहनांना पसंती देतात. यासाठी शैक्षणिक विभागातर्फे कडक पावले उचलण्याची गरज