महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय, ३०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 02:24 PM2022-03-11T14:24:42+5:302022-03-11T14:26:07+5:30
बचतगटाच्या माध्यमातून प्रगतीचे शिखर गाठणाऱ्या महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामविकास विभागाने महाजीविका अभियान सुरु केले आहे.
कोल्हापूर : बचतगटाच्या माध्यमातून प्रगतीचे शिखर गाठणाऱ्या महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामविकास विभागाने महाजीविका अभियान सुरु केले आहे. याच्या माध्यमातून ३०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय रचणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी मुंबईत केली.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने महाजीविका अभियानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, गृहनिर्माण (ग्रामीण)चे संचालक डॉ. राजाराम दिघे, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
मुश्रीफ यांनी चालू वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे होणार असल्याचे सांगताना यामध्ये उपजीविका व विपणन या विषयावर भर देण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याचे सांगितले. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान दहा लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यातील त्रुटी दूर करुन बचत गटांच्या महिलांचे जीवन सुखी व संपन्न करूया, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
महिलांच्या प्रगतीचा आलेख
- राज्यातील ५६ लाख कुटुंबांचा सहभाग
- ५ लाख ४७ हजार स्वयंसहाय्यता गट स्थापन
- १२ हजार ४७९ रुपयांच्या बँक कर्जाचे वाटप
- कोविडकाळात मास्क विक्रीतून ११.२५ कोटींची उलाढाल.
- सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचे बीजभांडवल वितरीत.
- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत ४ उपप्रकल्प मंजूर
जिल्हा परिषदेची शाळा देण्याची सूचना
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावातच व्यापार वाढीस लागावा म्हणून बचत गटाच्या महिलांना त्याच गावातील जिल्हा परिषदेची शाळा दीड दिवसांकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी केली.