पुनर्विकासातून ३० हजार अद्ययावत घरे, कोल्हापूरच्या प्रगतीला बळ; बांधकाम क्षेत्राची गती वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:52 PM2022-02-19T12:52:23+5:302022-02-19T12:53:16+5:30
तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास करणे उपयुक्त ठरणार
संतोष मिठारी
कोल्हापूर : सध्या कोल्हापूर शहरात तीस वर्षांपूर्वीच्या सुमारे एक हजार इमारती आहेत. त्यांचा पुनर्विकास साधल्यास अनेक गरजूंचे गृहस्वप्न तर साकारणार आहे, त्यासह बांधकाम क्षेत्राला गती मिळून कोल्हापूरच्या प्रगतीला बळ मिळणार आहे.
या इमारतींच्या पुनर्विकासातून अद्ययावत ३० हजार नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. कोरोनाने प्रत्येकाला स्वत:च्या घराचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे अनेकांची सध्या घरखरेदीच्या दिशेने पावले पडत आहेत. त्यामुळे कोल्हापुरातही घरांची मागणी वाढत आहे. महापुराचे पाणी येणाऱ्या परिसरात जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी गृहस्वप्न साकारण्यास नागरिक नकार देत आहेत.
त्याऐवजी पुराचे पाणी येत नसलेल्या राजारामपुरी, टाकाळा, माळी कॉलनी, प्रतिभानगर, साने गुरुजी वसाहत, हॉकी स्टेडियम आदी परिसराला ते प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी नव्या जागा अपेक्षा इतक्या प्रमाणात उपलब्ध नसल्याची अडचण आहे. अशा स्थितीत या परिसरातील तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास करणे उपयुक्त ठरणार आहे.
सध्या यातील अधिकतर इमारतींची दुरवस्था झाली आहे. तेथील रहिवासी असलेल्यांना त्या कमी पडत आहेत. त्यावर या इमारतींचा पुनर्विकास केल्याने त्यांना सध्याच्या क्षेत्रफळापेक्षा वाढीव क्षेत्रफळ, लिफ्ट, फायर सेफ्टी, कम्युनिटी स्पेस, पुरेसे पाणी आदी सुविधांसह अद्ययावत घरे मिळतील. त्यामुळे त्यांची जीवनशैली बदलण्यास मदत होईल. त्यासह या इमारतींमधील घरांची संख्या दुप्पट झाल्याने अनेक गरजूंचे गृहस्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ, बांधकाम क्षेत्राला गती
या इमारतींचा पुनर्विकासाने सध्या असलेल्या १५ हजार फ्लॅटची संख्या किमान ३० हजारांवर जाईल. त्यामुळे घरफाळा, पाणीपट्टी कराच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. नव्या घरांचे काम सुरू झाल्याने बांधकाम क्षेत्राला गती मिळेल. त्यातून रोजगार निर्मिती वाढण्यास हातभार लागणार आहे.
महापालिकेने चालना द्यावी
जुन्या, जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने सवलती देण्याचा निर्णय सप्टेंबर २०१९ मध्ये घेतला आहे. त्यात दहा टक्के अधिकचे चटईक्षेत्र, आवश्यक रस्ते, शिघ्रगणकाच्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने टीडीआर देणे, प्रिमिअमचा भरण्याचे टप्पे ठरविणे आदी सवलतींचा समावेश आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देणे आवश्यक आहे.
- शहरातील ३० वर्षांपूर्वीच्या इमारती : सुमारे एक हजार
- या परिसरात आहेत इमारती : शिवाजी पार्क, माळी कॉलनी, टाकाळा, राजारामपुरी, शाहुपुरी, बेलबाग (मंगळवारपेठ)
- पुनर्विकासातून नव्याने उपलब्ध होणारी घरे : ३० हजार
आमच्या रामसिना ग्रुपने आतापर्यंत शहरातील तीन जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. टाकाळा परिसरातील मनुस्मृती या चौथ्या प्रकल्पाची पायाभरणी आज, शुक्रवारी होणार आहे. शहरात सध्या तीस वर्षांपूर्वीच्या एक हजार जुन्या इमारती आहे. त्याचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. ते झाल्यास कोल्हापूरच्या विकासाला बळ मिळणार आहे. अनेकांचे अद्ययावत घराचे स्वप्न साकारणार आहे. एक सामाजिक बांधिलकीतून बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्विकासाचा विचार करून कोल्हापूरच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. -सचिन ओसवाल, एमडी, रामसिना ग्रुप
तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींची दुरवस्था झाली असून, तेथे राहणे धोकादायक ठरते. बदलत्या काळानुसार या इमारतींचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. त्यातून नवीन अद्ययावत घरे उपलब्ध होतील. त्यामुळे सध्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांबरोबरच कोल्हापूरच्या विकासाला हातभार लागणार आहे. - संजय आडके, आर्किटेक्ट