पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली कोल्हापूरकरांना अनोखी भेट, पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याला ३१ कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:15 AM2022-02-15T11:15:35+5:302022-02-15T11:16:13+5:30
अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात
कोल्हापूर : कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती पर्यटकांना व्हावी, पुरातन वास्तूंचे संवर्धन व्हावे यासाठी पर्यटनमंत्रीआदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना अनोखी भेट दिली असून, पर्यटन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी ३१ कोटी ३१ लाख इतका निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार आहे.
पर्यटन विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीबद्दल लवकरच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
रंकाळा तलाव, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी ४ कोटी ८० लाख, शहरात मल्टीपर्पज स्पोर्टस ग्राउंडसाठी ७५ लाख, ओपन जिम बसविण्यासाठी एक कोटी, विचारे माळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयासाठी ५० लाख, कळंबा तलावाच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी ४ कोटी ५० लाख, पन्हाळागड येथे लाईट शो, साऊंड शो, लेजर शो यासाठी १२ कोटी, शाहुवाडी पावनखिंड समाधीस्थळाच्या विकासासाठी ३० लाख, कागल तालुक्यातील निढोरी गावातील महादेव मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉकसाठी ३० लाख,
कागल येथील विठ्ठल रखुमाई मंदिर रस्ता सुधारणासाठी १६ लाख, कागल तालुक्यातील पिराचीवाडी महादेव मंदिर व हनुमान मंदिर परिसरात महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र भक्त निवाससाठी एक कोटी ७५ लाख, चंदगड तालुक्यातील देवरवाडीतील वैजनाथ देवस्थान मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी एक कोटी ९५ लाख, कागल तालुक्यातील सुरपली गावात तलाव परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रिटेनिंग वॉलचे बांधकाम करणे, स्वागत कमान उभारणे व महादेव मंदिर परिसरात सुशोभीकरण, मंदिर परिसराला जोडणारे रस्ते, राऊंड गटर आणि सांस्कृतिक हॉल बांधण्याकरिता तीन कोटी ३० लाख यांचा त्यात समावेश आहे.
नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी पाठपुरावा
अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा देणे, पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता नवनवीन संकल्पना राबविणे यासाठी पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना ३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर केला