३१ दूध संस्थांच्या निवडणुका बिनविरोध
By admin | Published: January 6, 2015 12:24 AM2015-01-06T00:24:12+5:302015-01-06T00:57:54+5:30
सव्वाचारशे दूध संस्था : जानेवारीअखेर प्रक्रिया पूर्ण होणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३१ प्राथमिक दूध संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. जानेवारीअखेर ४२८ दूध संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) व वारणा सहकारी संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आॅक्टोबर २०१४ अखेर जिल्ह्यातील सातशे दूध संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी ५४० दूध संस्थांचे आदेश काढले असून आतापर्यंत ४२८ दूध संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापैकी ३१ संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जानेवारीअखेर या संस्थांच्या निवडणुका पूर्ण होणार आहेत. इतर संस्थांची निवडणूक प्रक्रिया फेबु्रवारीअखेर पूर्ण केली जाणार आहे.
विठ्ठल दूध संस्था, मुरडे (ता. आजरा) व नवजीवन दूध संस्था, गवसे (आजरा) या दोन ‘क’ वर्गातील संस्थांमध्ये सर्वप्रथम मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. चव्हाण व एस. पी. पाटील यांनी दिली.
प्राधान्याने ‘गोकुळ’ संलग्न संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. संस्थांची संख्या जरी जास्त असली तरी नियोजनबद्धरीत्या प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने फेब्रुवारीअखेर सर्व संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील.
- अरुण चौगले, (सहायक निबंधक-दुग्ध)