३१ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 12:39 AM2016-04-16T00:39:20+5:302016-04-16T00:40:13+5:30

विभागातील साखर हंगाम बंद : ‘कुंभी’, ‘शाहू’ दोन दिवसांत; तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ आठवड्यात संपणार

31 factories scurry | ३१ कारखान्यांची धुराडी थंडावली

३१ कारखान्यांची धुराडी थंडावली

Next

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ३७ पैकी तब्बल ३१ सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम बंद झाला आहे. ‘कुंभी’, ‘शाहू’चा हंगाम येत्या दोन दिवसांत, तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ व ‘हुतात्मा’ या कारखान्यांची येत्या आठ दिवसांत धुराडी थंडावणार आहेत.
पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी मिळणार, असे आडाखे बांधत साखर कारखान्यांनी हंगामाची सुरुवात केली; पण उसाचे उत्पादन वाढत जाईल, तशी कारखान्यांची तारांबळ उडाली. उन्हामुळे शेवटच्या टप्प्यात उसाची उपलब्धता करताना सर्वच कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेची दमछाक उडाली.
गतवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बहुतांश कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दि. २५ मार्चपर्यंत हंगाम संपला होता; पण यावर्षी दि. १ नोव्हेंबरला हंगाम सुरू होऊन दि. २० मार्चपर्यंत १५, मार्चअखेर १०, तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ७ कारखाने बंद झाले. गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात साधारणत: दहा लाख टन, तर सांगली जिल्ह्यात सव्वादोन लाख असे सव्वा बारा लाख टन उसाचे उत्पादन जादा झाले असून, विभागातून २ कोटी ७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
उताऱ्यात ‘गुरुदत्त’चा दबदबा कायम
साखर उताऱ्यात ‘बिद्री’, ‘दालमिया’, ‘कुंभी’, ‘गुरुदत्त’ यांचाच वरचष्मा असतो; पण गेल्यावर्षी १३.३६ टक्के उतारा राखत ‘गुरुदत्त’ने आघाडी घेतली होती. यंदाही ‘गुरुदत्त’ने गळीत हंगामात १३.५३ टक्के उतारा ठेवून दबदबा कायम राखला आहे.
सरासरी उतारा घटणार
कोल्हापूर विभागाचा गतवर्षीचा सरासरी उतारा १२.५८ टक्के होता. त्यामध्ये कोल्हापूरचा १२.७७, तर सांगलीचा १२.२४ टक्के होता. यावर्षी कोल्हापूरचा १२.६०, तर सांगलीचा १२.०५ टक्के व विभागाचा सरासरी १२.४१ टक्के आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा उतारा घटण्याची शक्यता आहे.

Web Title: 31 factories scurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.