‘सीए’ परीक्षेत कोल्हापूरच्या ३१ जणांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 05:06 PM2022-07-16T17:06:29+5:302022-07-16T17:07:45+5:30

कोल्हापूर विभागातून गांधीनगरमधील सुमित नंदलाल नेचलानी याने प्रथम क्रमांक पटकविला

31 people from Kolhapur passed the Chartered Accountant exam | ‘सीए’ परीक्षेत कोल्हापूरच्या ३१ जणांची बाजी

‘सीए’ परीक्षेत कोल्हापूरच्या ३१ जणांची बाजी

googlenewsNext

कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा मे महिन्यात झाली. या परीक्षेचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला. कोल्हापूर विभागातून ३१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होवून बाजी मारली आहे. या विभागातून गांधीनगरमधील सुमित नंदलाल नेचलानी याने प्रथम क्रमांक पटकविला. मंडलिक पार्कमधील ऋचा सतीश परांजपे हिने द्वितीय, तर राजारामपुरी दुसरी गल्लीतील सबा नियाज मणेर हिने तृतीय क्रमांक मिळविला.

कोल्हापूर विभागात पाचगावमधील सौरभ एकनाथ भोपळे याने चौथा आणि राजारामपुरी १२ वी गल्लीतील अपूर्वा अनूप मेंच हिने पाचवा क्रमांक मिळविला. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचा टक्का वर्षागणिक वाढत आहे. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमृता विश्वास सूर्यवंशी, ऐश्वर्या सचिन सातार्डेकर, आदित्य अरुण बाहेती, यश शिवराम कुलकर्णी, किमया गोपाळ गर्दे, यश हेमंत सोनशेट, रसिका चंद्रकांत मार्ले, पवन बाजीराव सावंत, प्रतीक्षा मिलिंद ओक, विनिता प्रशांत मिरजे,

पूनम संजय पाटील, सनी धर्मू चंदवानी, निशिता समिर पेंढारकर, अपूर्वा कल्लाप्पा गंगाई, निरजा मानसिंग घाटगे, अभिषेक गिरीधर कानडे, रेवती विवेक कारंडे, अंकिता संजय खोपडे, उमेश हिंदुराव राऊत, भक्ती विजय ओसवाल, ओंकार सदाशिव चरापले, नम्रता निवास पाटील, कुणाल राजेंद्र पिसाळ, ऋतुजा भिवाजी गाडगीळ, सुशांत पाटील आणि श्रेया झावरे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

अभ्यासातील सातत्याच्या जोरावर यश

सीए होण्याचे ध्येय साध्य झाल्याचा खूप आनंद वाटत आहे. अभ्यासातील सातत्याच्या जोरावर ४७१ गुणांसह यश मिळविले आहे. रोज १२ तास अभ्यास करत होतो. शेवटच्या तीन महिन्यांत त्यात आणखी चार तास वाढविले. वडील हार्डवेअर व्यावसायिक आणि आई गृहिणी आहे. आता सीए म्हणून नोकरी करणार आहे. पुढे चार्टर्ड फायनान्सिअल ॲनॉलिस्ट होण्याची तयारी करणार असल्याचे सुमित नेचलानी याने सांगितले.

सेल्फ स्टडीवर भर

ही परीक्षा ४५४ गुणांनी उत्तीर्ण झाले आहे. शाळेत असल्यापासून सीए होण्याचे ठरविले होते. त्यानुसार बी.कॉम.ची पदवी घेऊन तयारी केली. कोरोना काळात ऑनलाइन लेक्चर केले. सेल्फ स्टडीवर भर देऊन तयारी केल्याचा चांगला फायदा झाला. वडील हे केडीसीसी बँकेच्या कळे शाखेचे व्यवस्थापक आहेत. आई सुष्मिता गृहिणी असल्याचे ऋचा परांजपे हिने सांगितले.

सराव, अभ्यास उपयोगी पडला

सराव आणि अभ्यासातील सातत्यामुळे सीएसारख्या अवघड परीक्षेत ४४२ गुणांसह यश मिळविल्याचा मोठा आनंद होत आहे. माझे वडील महावितरणमध्ये लेखा विभागात कार्यरत आहेत. आई साफिया गृहिणी आहे. सीए म्हणून प्रॅक्टिस करणार असल्याचे सबा मणेर हिने सांगितले.

डिसेंबरमधील परीक्षेत २८ जण उत्तीर्ण

डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कोल्हापूरचे २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलल्याने सीए परीक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे. कोल्हापूरमधून सीए होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वर्षागणिक वाढत आहे. त्याचा आनंद आहे. -सुशांत गुंडाळे, अध्यक्ष, आयसीएआय, कोल्हापूर

Web Title: 31 people from Kolhapur passed the Chartered Accountant exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.