तिघा कोल्हापूर पोलिसांसह ३१ जणांवर गुन्हा तरुणास मारहाण प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:06 AM2018-05-08T01:06:49+5:302018-05-08T01:06:49+5:30
कोल्हापूर : स्टेशन रोडवरील एका हॉटेलसमोर दोन गटांतील वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी ठाण्याच्या तिघा पोलिसांसह ३१ जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस संजय जाधवसह दोन गणवेशातील पोलिसांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, जखमी मार्शल ऊर्फ बापू मुकुंद गर्दे (वय २७, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) याच्यावरही बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, स्टेशन रोडवर रविवारी रात्री मद्यधुंद पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मार्शल गर्दे जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये गर्दी केली होती. यावेळी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी जमावाची समजूत घालत सोमवारी पहाटे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. घटनास्थळावरील पोलिसांनी मद्य प्राशन केले होते काय, याची तपासणी करण्यासाठी सहायक फौजदार संदीप जाधवसह अन्य दोन पोलिसांचे रक्ताचे नमुने सीपीआर रुग्णालयात घेतले. त्यामध्ये दारूचा अंश आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्णाचा तपास शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे करत आहेत.
जखमी मार्शल ऊर्फ बापू मुकुंद गर्दे (वय २७, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) याने फिर्यादीत म्हटले आहे की, मी रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्टेशन रोडवरील एका हॉटेलसमोर उभा असताना अनोळखी कारमधून आलेल्या संजय जाधव व त्यांच्या सहकाºयांनी फायबरच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर दाभोळकर कॉर्नर चौक येथे फरफटत नेत गणवेशातील पोलिसांनी छातीवर काठीने मारहाण केली.
शाहूपुरीचे सहायक फौजदार संदीप विठ्ठलराव जाधव (४३, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकात कार्यरत आहे. रविवारी रात्री हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना मित्र माजी हॉकीपटू दया पाटील हे मित्रांसोबत स्टेशन रोडवरील अनुग्रह हॉटेल येथे जेवणाकरिता आले होते.
मी त्यांना भेटण्यासाठी गेलो असता, हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर तरुणांचे दोन गट लाकडी काठ्या व दगड घेऊन हाणामारी करत होते. त्यांना हटकण्यासाठी पुढे गेलो असता संशयित मार्शल गर्दे याने मला धक्काबुक्की करून हातावर काठी मारली. मित्र दया पाटील याच्या डोक्यात मारहाण करून जखम केली. त्यानंतर मी पोलीस ठाण्यास फोन करून मदतीसाठी पोलीस मागवून घेतले.
संशयितांना चालत पोलीस ठाण्याकडे घेऊन येत असताना काँग्रेस भवनजवळ आलो असता गर्दे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालत गर्दे याला जबरदस्तीने घेऊन गेले. त्यानुसार संशयित गर्दे याच्यासह पंचवीसजणांच्या विरोधात बेकायदा जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
घटनास्थळावरील चर्चा वेगळीच
मार्शल गर्दे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो काही मित्रांसोबत स्टेशन रोडवर आला होता. याठिकाणी त्याची माजी हॉकीपटू दया पाटील व त्यांच्या सहकाºयांसोबत बाचाबाची झाली. एकमेकाला शिवीगाळ झाल्याने पाटील यांनी मित्र सहायक फौजदार संदीप जाधव यांना बोलावून घेतले. जाधव यांनी गर्देला जाब विचारत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या मित्रांनीही हात उगारले. यावेळी गर्दे व त्याच्या मित्रांनीही जोरदार हाणामारी केली. यावेळी दोन्ही बाजूंनी दगड, विटांचा वापर करण्यात आला. सहायक फौजदार जाधव यांनी मदतीला रात्रड्युटीवर असलेल्या पोलिसांना बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी येऊन गर्देला बेदम मारहाण केल्याची घटनास्थळावर चर्चा आहे.
स्टेशन रोडवर घडलेल्या मारहाणीची माहिती घेतली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना यासंबंधी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. संबंधित पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल.
- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक