पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ३१४ गर्भवतींना गावातून हलवले, जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:25 PM2024-07-25T17:25:02+5:302024-07-25T17:27:28+5:30
सीईओंची चिखली, आंबेवाडीला भेट
कोल्हापूर : जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने आपली यंत्रणा आणखी सक्रिय केली आहे. आरोग्य विभागाने बाराही तालुक्यांतील संपर्क तुटू शकणाऱ्या गावातील ३१४ गरोदर महिलांना सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हलवले आहे. यामध्ये सर्वाधिक महिला या हातकणंगले तालुक्यातील आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बुधवारी सकाळी आंबेवाडी, प्रयाग चिखली, शिये येथे भेटी देऊन पाहणी केली.
सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य सहायक आणि ग्रामसेवक पदाच्या परीक्षा सुरू आहेत. बुधवारच्या दुपारी होणाऱ्या दोन सत्रांतील परीक्षेसाठी प्रयाग चिखलीची माध्यमिक शाळा केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. आदिवासी क्षेत्र आणि कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द झालेल्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. या ठिकाणी रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने परीक्षार्थींना जाता येईल की नाही याची खात्री करण्यासाठी कार्तिकेयन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई सकाळी सव्वानऊ वाजता चिखली येथे गेले होते.
संध्याकाळपर्यंत पूर्णपणे वाहतूक बंद होणार नसल्याची खात्री झाल्याने आणि परीक्षार्थींना येण्याजाण्याची अडचण नसल्याचे स्पष्ट झाल्याने याबाबतची पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. दरम्यान, संध्याकाळी जर पाणी वाढले आणि विद्यार्थ्यांची गावाबाहेर जाण्याची अडचण झाली तर रिक्षाची व्यवस्था करण्याच्याही सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या होत्या. पुढे कार्तिकेयन यांनी सोनतळी येथील जनावरांच्या छावणीलाही भेट दिली. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर सोबत होते. या वेळी वेळीच ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरित व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या.
तालुकावर हलवण्यात आलेल्या गरोदर महिला
हातकणंगले १५४
शिरोळ ५६
पन्हाळा १६
करवीर १२
चंदगड ०७
गगनबावडा ०७
कागल ०६
शाहूवाडी ०६
राधानगरी ०३
एकूण २६७