Kolhapur: ३१५ रुपयांचा मासिक पास, मग कसली ही टोल माफी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 03:36 PM2024-08-09T15:36:57+5:302024-08-09T15:39:32+5:30

वाहनधारकांची विचारणा : किणी परिसरातील २० किलोमीटरच्या गावांना लाभ

315 rupees per month for a monthly pass at any toll booth then what kind of toll waiver | Kolhapur: ३१५ रुपयांचा मासिक पास, मग कसली ही टोल माफी?

Kolhapur: ३१५ रुपयांचा मासिक पास, मग कसली ही टोल माफी?

कोल्हापूर : किणी टोलनाक्यावरून परिसरातील २० किलोमीटरच्या परिघातील ग्रामस्थांकडून एकही रुपया टोल घेतला जाणार नाही; परंतु यासाठीच्या मासिक पाससाठी जी प्रक्रिया आहे त्याचा व्यवस्थापन खर्च म्हणून महिन्याला ३१५ रुपये द्यावे लागणार आहेत. या मासिक पासच्या आधारे नागरिक येथून प्रवास करू शकतील. त्यांना वेगळा टोल नसेल असे स्पष्टीकरण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कोल्हापूर येथील प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. दरमहा हा पास काढायचा असेल तर मग काँग्रेसच्या आंदोलनानंतर टोल माफ झाला असे कसे म्हणता येईल, अशी विचारणा वाहनधारक करत आहेत.

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात किणी टोलनाक्यावर रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल आणि अन्यायी टोल आकारणीबद्दल आंदोलन करण्यात आले हाेते. यावेळी आंदोलन मागे घेताना प्रकल्प संचालक पंदरकर यांच्या स्वाक्षरीने जे पत्र देण्यात आले होते त्यातील काही मुद्यांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने त्यांच्याशी संपर्क साधून हे स्पष्टीकरण घेण्यात आले.
पंदरकर म्हणाले, पाऊस कमी आल्यामुळे खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत ही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील. टोलमध्ये ५० टक्के सवलतीचा मुद्दा आंदोलकांनी मांडला होता. यातील २५ टक्के टोलमाफी रस्त्याचे काम जेव्हा सुरू केले तेव्हापासून सुरूच आहे. हे काम सुरू होण्याआधी ९० रुपये टोल होता. तो गेले वर्षभर ७० रुपये आहे. आणखी २५ टक्के टोलमाफीसाठी केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे.

ते म्हणाले, मासिक पासबाबत काही गैरसमज झाले आहेत. २० किलोमीटरच्या परिघातील गावांतील वाहनांना टोलमाफी कायद्यानुसार देण्यात आली आहे; परंतु मासिक पाससाठी संबंधित बँक, पास प्रक्रिया यासाठी महिन्याला ३१५ रुपये देऊन पास घ्यावा लागणार आहे. त्यामुळे टोलमाफी असली तरी प्रक्रिया शुल्क म्हणून ३१५ भरून मासिक पासचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे.

आधार कार्ड हवेच जर..

ज्यांचे आधार कार्ड किणी टोलनाक्याच्या परिघातील २० गावांतील आहे अशांनाच या टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. अन्य ठिकाणचे आधारकार्ड असेल तर परिघातील गावांतील एखादा नागरिक असला तरी त्यांना पास देता येणार नाही. हा जर नियम असेल तर मग प्राधिकरण आधार कार्ड पाहूनच टोलमध्ये सवलत का देत नाही..? त्यासाठी दरमहा वेगळा पास काढण्याची काय गरज आहे? असेही या परिसरातील लोक विचारू लागले आहेत.

टोलनाक्यावरच होणार पासचे नूतनीकरण

प्रत्येक महिन्याला जो पास देण्यात येणार आहे, त्याचे नूतनीकरण दर महिन्याला करावे लागणार आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होणार नाही का? अशी विचारणा केली असता, या पासचे नूतनीकरण टोलनाक्यावरच काही मिनिटांमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 315 rupees per month for a monthly pass at any toll booth then what kind of toll waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.