वीज बिलाबाबत चार दिवसांत ३१६० तक्रारी, महावितरणकडे लागली रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:35 AM2020-07-01T11:35:23+5:302020-07-01T11:37:48+5:30
लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे चार दिवसांत ३७ उपविभागांत स्थापन केलेल्या केंद्रांत ३१६० तक्रारींचा महापूर आला आहे. त्यांपैकी ३१५० तक्रारींचे निवारण झाले असून केवळ १० तक्रारी शिल्लक आहेत. या कक्षाचा लोकांना चांगला उपयोग होत असल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे चार दिवसांत ३७ उपविभागांत स्थापन केलेल्या केंद्रांत ३१६० तक्रारींचा महापूर आला आहे. त्यांपैकी ३१५० तक्रारींचे निवारण झाले असून केवळ १० तक्रारी शिल्लक आहेत. या कक्षाचा लोकांना चांगला उपयोग होत असल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग आणि बिलवाटपाची प्रक्रिया पूर्णपणे बंद होती. १ जूनपासून ही सर्व प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. तीन महिन्यांची बिले एकदमच घरी आल्याने आकडा वाढला आहे. लावलेले दर कळत नाहीत, युनिट किती झाले हे समजत नाही, अशी तक्रारी ग्राहकांतून वाढल्या. त्यातूनच जागोजागी आंदोलनेही सुरू झाली होती.
बिलावरून वातावरण तापू लागल्यानंतर महावितरणने जिल्ह्यातील ३७ ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी कक्ष स्थापन केले. येथे महावितरणचे अधिकारी यांना आलेल्या बिलाविषयी ग्राहकाचे समाधान होत नाही तोवर त्यांना विश्लेषण करून देतील, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार हे अधिकारीही दिवसभर येथे थांबून येणाऱ्यांचे समाधान करीत आहेत.
जिल्ह्यातून ३१६० ग्राहकांनी तक्रारी नोंंदवल्या होत्या. त्यांत १५४९ तक्रारी या शहरी भागातून आलेल्या होत्या. एकूण तक्रारींपैकी घरगुती २६८२ होत्या, त्यातील २६७३ ची सोडवणूक झाली तर नऊ ग्राहकांचे समाधान होऊ शकले नाही.
व्यावसायिकच्या २२७ तक्रारी आल्या, त्या सर्वच्या सर्व सोडवण्यात आल्या. औद्योगिकच्या २२९ तक्रारी होत्या, त्यांतील एक शिल्लक राहिली. बाकी सर्व सुटल्या. इतर तक्रारी २२ आल्या होत्या, त्यांतील २१ सुटल्या, एकच शिल्लक राहिली.
उपविभागनिहाय तक्रारी
- आजरा ३२
- चंदगड १६
- गडहिंग्लज ५२
- नेसरी १६
- इचलकरंजी (ग्रा.) ३७८
- इचलकरंजी ३३५
- इचलकरंजी ९६
- हातकणंगले १८
- जयसिंगपूर ४७
- कुरुंदवाड ५०
- शिरोळ १८
- वडगाव ०६
- गगनबावडा १८
- कदमवाडी २१
- कळे ४९
- कोडोली ३२
- मलकापूर ३८
- पन्हाळा २३
- परिते १६
- फुलेवाडी ३६
- गारगोटी ५८
- हुपरी १३९
- कागल ५७
- मुरगूड ० ८
- राधानगरी ५२
- कोल्हापूर शहर - १५४९