ड्रेनेज योजनेसाठी ३२ कोटी मंजूर
By admin | Published: February 10, 2017 10:45 PM2017-02-10T22:45:59+5:302017-02-10T22:45:59+5:30
‘नगरविकास’कडून आदेश : सांगलीसाठी २०.३५ कोटी, तर मिरजेसाठी ११.१८ कोटींचा निधी
सांगली : सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजनेसाठी ३१ कोटी ५४ लाख १४ हजार रुपयांचा दुसरा हप्ता महापालिकेच्या हाती लवकरच मिळणार आहे. नगरविकास खात्याचे सहसचिव पां. जो. जाधव यांनी निधी वितरणाचा आदेश शुक्रवारी काढला आहे. त्यामुळे आता सांगली व मिरजेच्या ड्रेनेज योजनेला गती मिळणार आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी निधी मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
२०१० मध्ये विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सांगलीसाठी ८२.२२, तर मिरजेसाठी ५६.५३ कोटींची ड्रेनेज योजना मंजूर केली होती. या योजनेला २०१३ मध्ये मुहूर्त लागला. योजनेची निविदा जादा दराने मंजूर झाल्याने १३८ कोटीची योजना १८७ कोटींवर गेली आहे. गेल्या चार वर्षात या योजनेतील सांगली आणि मिरजेत कामे सुरू आहेत. या योजनेत काही प्रमाणात गैरकारभार झाल्याच्या तक्रारी झाल्या. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारीही झाल्या होत्या. त्याबाबत चौकशीचा फेराही झाला आहे.
आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. ठेकेदार, पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन खेबूडकर यांनी योजनेला गती दिली. यापूर्वी राज्य शासनाने सांगलीसाठी २० कोटी ५६ लाख, तर मिरजेसाठी २८ कोटी ६३ लाखाचा निधी दिला होता. या निधीतील कामे पूर्ण करून त्याचे युुटिलिटी प्रमाणपत्र नगरविकास खात्याकडे सादर केले होते. त्यानंतर सांगलीसाठी दुसरा हप्ता व मिरजेसाठी सुधारित आकृतीबंधानुसार निधी मिळविण्यासाठी खेबूडकर यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने शुक्रवारी सांगलीसाठी दुसरा हप्ता २० कोटी ३५ लाख, तर मिरजेसाठी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवडाभरात हा निधी महापालिकेकडे वर्ग होईल. त्यातून ड्रेनेज योजनेतील प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.
दरम्यान, ड्रेनेज योजना लवकरात लवकर मार्गी लागावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणल्याचे आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनी सांगितले. दोन्ही शहरातील उपनगरांमध्ये ही योजना येत्या एप्रिलअखेर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने ठेकेदार, मनपा प्रशासनाला कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
आणखी सोळा कोटी येणार
महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सांगलीसाठी ५ कोटी ८३ लाखाचा मनपा हिस्सा योजनेत समाविष्ट केल्यानंतर शासनाकडून आणखी १६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यासाठी ड्रेनेज विभागाकडून प्रयत्न होणार आहेत.