रायगडावर ३२ मणाचे सुवर्ण सिंहासन
By admin | Published: May 29, 2017 11:15 PM2017-05-29T23:15:51+5:302017-05-29T23:15:51+5:30
रायगडावर ३२ मणाचे सुवर्ण सिंहासन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन उभे करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात करण्यासाठी येत्या ४ जूनरोजी किल्ले रायगडावर संकल्प सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
भिडे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर रायगड मुघल सत्तेच्या हाती पडला. मुघलांनी रायगडावरील सर्व वस्तू व ऐतिहासिक कागदपत्रे जाळून नामशेष केली. ३२ मण वजनाच्या सुवर्ण सिंहासनाच्या चिरफाळ्या करून ते लुटून नेले. या घटनेला आज ३२९ वर्षे झाली आहेत. आता श्री शिवप्रतिष्ठानने हिंदवी स्वराज्याचे ते सिंहासन पुनर्संस्थापित करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी सर्व धारकरी, शिवसैनिक व शिवपाईकांनी सिंहासनाच्या पुनर्संस्थापनेचा सामूहिक संकल्प करण्यासाठी ४ जूनला रायगडावर उपस्थित राहावे. छत्रपती शिवरायांचे हे सुवर्ण सिंहासन संपूर्ण राष्ट्राला प्रेरणादायी ठरेल. सुमारे दोन लाख धारकरी उपस्थित राहतील. संकल्प सोहळ्यास ३ जूनला रात्री नऊपासून प्रारंभ होईल. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपेल.
ते म्हणाले की, या सुवर्ण सिंहासन संकल्पास मोठी आर्थिक मदत मिळेल. मदत स्वीकारण्यासाठी संस्थेची स्थापना होणार आहे. याची घोषणा रायगडावर कार्यक्रमात केली जाईल. संस्थेच्या बँक खात्यावर मदत जमा करून घेतली जाईल. अनेकजण सोने देण्यास पुढे आले आहेत. पण आम्ही त्यांना पैशाच्या स्वरूपात मदतीचे आवाहन केले आहे. सुवर्ण सिंहासन बनविण्यास काही कलाकारही पुढे आले आहेत. लवकरच संकल्प पूर्ण केला जाईल. सिंहासनाच्या सुरक्षेसाठी शिवप्रेमींची फौज उभी केली जाईल. या कार्यक्रमास येणाऱ्या धारकऱ्यांनी भगवा फेटा बांधावा. रायगडावर कोणतेही खाद्यपदार्थ विकत घेऊ नयेत. स्वत:ला पुरेल एवढी चारवेळची शिदोरी व दोन जलकुंभ येताना घेऊन यावे. प्रत्येक धारकऱ्याने रायगडावर हिंदवी स्वराज्य व्रताची दीक्षा व शपथ घ्यायची आहे. त्यासाठी स्वत:बरोबर दोन जानवी आणावीत.
सरकारकडे जाणार नाही!
संभाजीराव भिडे (गुरुजी) म्हणाले, राजकीय पक्ष, राजकारण व राजकीय नेतृत्व न घेता हे कार्य पूर्ण केले जाईल. केंद्र व राज्य सरकारची परवानगी घेणार नाही. हे सुवर्ण सिंहासन लवकरच तयार करण्याचा मानस आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सरकारच्या दारात जाणार नाही.