बागेवाडी येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ३२ मेंढ्यांचा मृत्यू; २० मेंढ्या गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:49 PM2023-09-26T20:49:45+5:302023-09-26T20:50:23+5:30
कोल्हापूरच्या मेंढपाळाचे चार लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : बागेवाडी (ता. जत) येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ३२ मेंढ्यांचा मृत्यू झाला. कुंभारी रस्त्यावर नानासाहेब पडळकर यांच्या शेतात सोमवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये मेंढपाळाचे चार लाखांचे नुकसान झाले. २० मेंढ्या अद्याप गायब असून मेंढपाळ त्यांचा शोध घेत आहेत.
बिरू विठ्ठल जोग (रा. राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) हा मेंढपाळ मेंढ्या चरवण्यासाठी बागेवाडी परिसरात आला आहे. रात्री पडळकर यांच्या शेतात मुक्काम होता. सर्व मेंढ्या एकत्रित बसवल्या होत्या. रात्री केव्हातरी लांडग्यांच्या दोन कळपांनी अचानक झडप घातली. त्यावेळी मेंढ्यांनी मोठा कोलाहल केला. हल्ल्यात ३२ मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर २० मेंढ्या पळून गेल्या. त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. जोग यांच्या कळपात २५० मेंढ्या होत्या. बागेवाडी परिसरात मध्यरात्री जोराचा पाऊस पडत होता. त्यामुळे मेंढपाळ आडोशाला जाऊन झोपले होते. त्याचवेळी लांडग्यांनी हल्ला केला. पावसामुळे हल्ल्याची कल्पना लगेच आली नाही. काही वेळांनी आवाज ऐकून धाव घेतली, तेव्हा लांडग्यांच्या हल्ल्याची तीव्रता दिसून आली.
लांडग्यांना घाबरून अनेक मेंढ्या सैरभर झाल्या. बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे, लक्ष्मण चौगुले, शेतमालक नानासाहेब पडळकर यांनी पाहणी केली. कुंभारी (ता. जत) येथील नाथा पाटील यांनी मेंढपाळांना आर्थिक मदत केली. मंगळवारी दिवसभर वनविभागाचे कर्मचारी पंचनामे करत होते.