३२२ उमेदवार पात्र; ५२ अर्ज अवैध
By admin | Published: March 1, 2016 12:24 AM2016-03-01T00:24:58+5:302016-03-01T00:25:12+5:30
गडहिंग्लज कारखाना निवडणूक : सात तास छाननी; तिघांच्या अर्जांवर आज निर्णय
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३७७ उमेदवारांनी ४७१ अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल केलेल्या ३७७ उमेदवारांपैकी ३२२ जणांचे अर्ज पात्र, तर ५२ जणांचे अर्ज अवैध ठरले. विद्यमान संचालक अॅड. विकास पाटील व भैरू पाटील-वाघराळकर यांच्यासह कामगार प्रतिनिधी शशिकांत चोथे यांच्या अर्जावरील हरकतीबाबतचा निर्णय आज, मंगळवारी देण्यात येणार आहे. छाननी प्रक्रिया तब्बल सात तास चालली.
निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार आणि सहायक निवडणूक अधिकारी हनुमंत पाटील व धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये छाननी झाली. सर्वच पक्ष-गटांतर्फे उमेदवारांची बाजू मांडण्यासाठी निष्णात कायदेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे छाननीसाठी मोठी गर्दी झाली होती.
जनता दलाच्या उमेदवारांची बाजू अॅड. राहुल देसार्इंनी, प्रकाश चव्हाण गटाच्या उमेदवारांची बाजू अॅड. पी. डी. पोवार यांनी, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बाजू अॅड. दत्ता राणे यांनी, शहापूरकर गटाच्या उमेदवारांची बाजू अॅड. लुईस शहा यांनी मांडली. कारखान्यातर्फे अॅड. रवी तोडकर व अॅड. संजय देसाई उपस्थित होते. त्यांना अॅड. विजय मदकरी व दत्ता देसाई यांनी सहकार्य केले.
उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी अध्यक्ष अॅड. शिंदे व डॉ. शहापूरकर, संग्रामसिंह नलवडे, संग्रामसिंह कुपेकर, राजेंद्र गड्यान्नावर, प्रा. स्वाती कोरी, मारुती राक्षे, आदी उपस्थित होते.
दिग्गजांचे अर्ज अवैध
छाननीत चंदगड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, माजी सभापती इकबाल काझी, गडहिंग्लज तालुका संघाचे अध्यक्ष मलगोंडा पाटील, बाजार समितीचे संचालक जितेंद्र शिंदे, अॅड. व्ही. एस. पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे, माजी संचालक प्रा. सुभाष शिरकोळे, भिकाजी दळवी, मल्लाप्पा मंगसुळे, आदी प्रमुख मंडळींचे अर्ज छाननीत अवैध ठरले.
तिघांच्या अर्जावर आज निर्णय
सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संचालकपद रद्द केलेल्या अॅड. विकास पाटील व भैरू पाटील-वाघराळीकर यांच्या अर्जावर माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी, तर जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते व कारखान्याचे कामगार प्रतिनिधी शशिकांत चोथे यांच्या अर्जावर चव्हाण गटाच्या सुभाष चोथेंनी हरकत घेतली. या तिघांच्याही अर्जावर तब्बल तीन तास सुनावणी झाली. मात्र, या संदर्भातील निर्णय आज, मंगळवारी देण्यात येईल, असे निवडणूक अधिकारी पवार यांनी सांगितले.