बालकल्याण संकुलमधील ३३ मुले कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:44+5:302021-05-13T04:25:44+5:30

कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील आणखी ३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये दहा ते अठरा वयोगटातील ३३ मुले व ...

33 children in child welfare complex corona positive | बालकल्याण संकुलमधील ३३ मुले कोरोना पॉझिटिव्ह

बालकल्याण संकुलमधील ३३ मुले कोरोना पॉझिटिव्ह

Next

कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील आणखी ३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये दहा ते अठरा वयोगटातील ३३ मुले व चौघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये तातडीने हलविण्यात आले. सोमवारी घेतलेल्या स्वॅबचा रिपोर्ट बुधवारी रात्री आठच्या सुमारास मिळाल्यानंतर संकुलमधील प्रशासन यंत्रणाच हादरली. तीन दिवसांपूर्वी १४ मुली पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यामुळे संकुलमधील लागण झालेल्यांची संख्या ५१ झाली आहे.

बालकल्याण संकुलमध्ये रविवारी करण्यात आलेल्या अँटिजन टेस्टमध्ये १४ मुली पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांना तातडीने शिवाजी विद्यापीठात कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याने दिलासा मिळाला असतानाच बुधवारी बालकल्याण संकुलमध्ये आणखी ३७ जण पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वांच्याच उरात धडकी भरली. रविवारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सोमवारी १२७ मुले व २६ कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट मंगळवारी येणे अपेक्षित होते, पण स्वॅबची संख्या जास्त असल्याने तो बुधवारी रात्री आठच्या सुमारास आला. तोपर्यंत संकुलमधील वातावरण धीरगंभीर होते. रिपोर्ट आल्यानंतर संकुलच्या मानद कार्यवाहक पद्मजा तिवले यांनी तातडीने धाव घेतली. मुलांबरोबरच कर्मचारीही बाधित बनल्याने संकुलमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चौकट ०१

लसीकरण व तपासणीची मागणी

व्ही. बी. पाटील व पद्मजा तिवले यांनी सायंकाळी साडेपाच वाजता महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन, बालकल्याण संकुलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण करावे, अशी मागणी केली, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन, पोक्सो कायद्यांतर्गत पाठविल्या जाणाऱ्या मुलींना कोरोना चाचणी केल्याशिवाय संकुलात पाठवू नये, अशी मागणी केली. यावर दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: 33 children in child welfare complex corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.