खुशखबर! व्याज सवलतीचे ३३.९८ कोटी दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर, तीन वर्षांचा परतावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 02:02 PM2023-04-05T14:02:10+5:302023-04-05T14:02:44+5:30

पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसांच्या आत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते

33 crore 98 lakh rupees from dr. Punjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme will be credited to farmers accounts | खुशखबर! व्याज सवलतीचे ३३.९८ कोटी दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर, तीन वर्षांचा परतावा 

खुशखबर! व्याज सवलतीचे ३३.९८ कोटी दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर, तीन वर्षांचा परतावा 

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील प्रलंबित २ लाख ६७ हजार २५६ शेतकऱ्यांचे अनुदानापोटी ३३ कोटी ९८ लाख रूपये दोन दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांचा व्याज परतावा मिळणार असून, जिल्ह्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात ५६ कोटी २८ लाख रूपये आले आहेत.

शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची योजना सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकांच्या माध्यमातून वाटप केलेल्या पीक कर्जावर राज्य शासन शेतकऱ्यांना व्याज सवलत देते. पूर्वी एक लाखापर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जायचे. आता कर्जमर्यादा तीन लाखापर्यंत केली आहे. पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसांच्या आत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते.

आपल्याकडे ऊस पीक मोठ्या प्रमाणात असल्याने मार्च व जूनमध्ये पीक कर्जाची उचल होते.
गेल्या वर्षभरात ३ लाख ९१ हजार २२ शेतकऱ्यांना ५६ कोटी २८ लाख ६४ हजार रूपये व्याज परताव्याची रक्कम मिळाली आहे. मार्च महिन्यात २ लाख ४३ हजार ९३६ शेतकऱ्यांचे ३० कोटी ९९ लाख व २३ हजार ३२० शेतकऱ्यांचे २ कोटी ९९ लाख असे ३३ कोटी ९८ लाख रूपये आले आहेत.

२०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांना आगामी वर्षभरात व्याज परताव्याचे पैसे मिळणार आहेत.

पाच लाखांपर्यंतचा लाभ २०२२-२३ पासून

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाच लाख पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी २०२२-२३ पासून केल्याने याचा लाभ पुढील वर्षी मिळणार आहे.

विकास संस्थांकडून व्याजाची वसुली

विकास संस्था संबंधित शेतकऱ्यांकडून ६ टक्केप्रमाणे व्याजाची वसुली करतात. शासनाकडून व्याज परतावा आल्यानंतर तो शेतकऱ्यांना दिला जातो.

जिल्ह्यात ८५ टक्के शेतकऱ्यांकडून नियमित परतफेड

जिल्ह्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ८५ टक्के शेतकऱ्यांकडून वर्षाच्या आत परतफेड केली जाते. जिल्हा बँक २,१४५ कोटी पीक कर्जाचे वाटप करते. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरला व्याज परताव्याचा लाभ अधिक मिळतो.

वर्षभरात असे आलेत पैसे :
कार्यालय    -  परताव्याचे आलेले पैसे
आयुक्त कार्यालय  -  ४८ कोटी २८ लाख ७१ हजार
जिल्हा नियोजन समिती  -  ७ कोटी ९९ लाख ९३ हजार

Web Title: 33 crore 98 lakh rupees from dr. Punjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme will be credited to farmers accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.