कोल्हापूर जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त ३३० कर्मचारी पुन्हा सेवेत, सहकार विभागाची मान्यता
By राजाराम लोंढे | Published: June 12, 2023 03:44 PM2023-06-12T15:44:09+5:302023-06-12T15:45:07+5:30
गेल्या चाैदा वर्षांत भरती झाली नाही. मात्र, तब्बल ९०० हून अधिक कर्मचारी कमी झाले. त्यामुळे बँकेच्या यंत्रणेवर कमालीचा ताण
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्हा बँकेतून सेवानिवृत्त झालेले ३३० कर्मचारी पुन्हा सेवेत घेण्यास सहकार विभागाने परवानगी दिली आहे. व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, निरीक्षकसह इतर पदांवरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लिपिक व शिपाई पदावर काम करावे लागणार आहे. यामध्ये १३० शिपाई तर २०० लिपिक म्हणून घेतले जाणार आहेत.
जिल्हा बँकेमध्ये २००९ ला भरती झाली होती. त्यानंतर गेल्या चाैदा वर्षांत भरती झाली नाही. मात्र, तब्बल ९०० हून अधिक कर्मचारी कमी झाले. त्यामुळे बँकेच्या यंत्रणेवर कमालीचा ताण जाणवत आहे. सध्या बँकेच्या १९१ शाखा असून व्यवसाय १३ हजार कोटी इतका आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाले आणि व्यवसाय तीन पटीने वाढला. त्यामुळे अनेक शाखांत कर्मचारीच नाहीत. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या असून काही कर्मचाऱ्यांना आजारी असताना कामावर यावे लागत आहे.
ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि भरती करता येत नसल्याने संचालक मंडळाने बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बँकेने सहकार विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला मान्यता मिळाल्याने ३३० सेवानिवृत्त कर्मचारी बँकेच्या सेवेत पुन्हा येणार आहेत. संचालक मंडळात मंजुरी घेऊन कर्मचाऱ्यांना हजर करून घेतले जाणार आहे.
लिपिकाला २० हजार पगार
लिपिकाला २० हजार रूपये तर शिपाई पदावर काम करणाऱ्यांना १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
२० महिन्यांचा करार?
वित्तीय संस्थेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यावर जबाबदारी देणे जोखमीचे असते. या कर्मचाऱ्यांसोबत २० महिन्यांचा करार केला जाणार असून त्यांच्याकडून सुरक्षितता म्हणून किमान ५ लाख रूपये ठेव घेण्याबाबत विचार सुरू आहे.
सेवानिवृत्त ४५० कर्मचाऱ्यांचे अर्ज
दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा काम करण्यास तयार असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवले होते. तब्बल ४५० कर्मचाऱ्यांचे अर्ज बँकेकडे आले आहेत.
‘भरती’चा पुणे पॅटर्न
पुणे जिल्हा बँकेने दोन वर्षांच्या मुदतीने सेवानिवृत्त कर्मचारी घेतले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे रीतसर प्रस्ताव पाठवून मंजुरी घेऊन भरती केली होती. हा ‘पुणे पॅटर्न’ कोल्हापूर जिल्हा बँक राबवणार आहे.
ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेण्याबाबत प्रस्तावित आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. - डॉ. ए. बी. माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक).