लग्नाच्या आमिषाने बलात्काराचे ३४ गुन्हे दाखल - अकरा महिन्यांतील चित्र : सोशल मीडियाचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:10+5:302020-12-17T04:47:10+5:30
कोल्हापूर : गेल्या ११ महिन्यांत लग्नाच्या आमिषाने मुलींवरील बलात्काराच्या ३४ गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. यात सोशल मीडियावरील ओळखीने ...
कोल्हापूर : गेल्या ११ महिन्यांत लग्नाच्या आमिषाने मुलींवरील बलात्काराच्या ३४ गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. यात सोशल मीडियावरील ओळखीने झालेले प्रेम, नंतर ब्लॅकमेलिंगचे प्रकार अशा गुन्ह्यांचाही समावेश आहे.
यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यानंतरच्या पुढील सहा महिन्यांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली. मात्र याला लग्नाच्या आमिषाने फसवणूक आणि बलात्काराचे गुन्हे अपवाद आहेत. या लॉकडाऊनच्या काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले. त्याचप्रमाणे लग्नाच्या आमिषाने फसवणूक आणि बलात्काराच्या गुन्ह्यांमध्येही किंचित वाढ झाली आहे.
यातील बहुतांश घटनांमध्ये मुलगा-मुलीच्या ओळखीचे मैत्रीत, पुढे प्रेमात रूपांतर होते. एकमेकांच्या संमतीने प्रकरण पुढे जाते; पण मध्येच नात्यामध्ये वितुष्टता आली, पटले नाही आणि मुलगा लग्न करण्यास टाळाटाळ करीत असला की बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो. यातील मोजक्याच प्रकरणांमध्ये दाखल झालेला गुन्हा शिक्षेपर्यंत जातो. अनेकदा यात न्यायालयाबाहेर तडजोडी होतात आणि गुन्हा मागे घेतला जातो.
---
समाजमाध्यमांबद्दल जागरूक रहा
फेसबुक, व्हाॅट्सॲप यांसारख्या समाजमाध्यमांतून ओळख होऊन मुलींची फसवणूक झाल्याच्या क्वचितच घटना कोल्हापूर दप्तरी नोंद आहेत. लग्नाच्या आमिषाने फसवणूक झाल्यावर मुलीचे अश्लील फोटो किंवा व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. अशा ब्लॅकमेलिंगविरोधातील तक्रारी वर्षातून सात-आठ तरी दाखल होतात. त्यामुळे या माध्यमांबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे.
--
गतवर्षी दाखल झालेले बलात्काराचे एकूण गुन्हे : १२१
त्यांपैकी लग्नाच्या आमिषाने बलात्काराचे गुन्हे : ३२
गेल्या ११ महिन्यांत दाखल झालेेले बलात्काराचे गुन्हे : १०७
त्यांपैकी लग्नाच्या आमिषाने बलात्काराचे गुन्हे : ३४
---
पोलिसांचा कोट नंतर स्वतंत्र
---
इंदुमती गणेश