जिल्ह्यासाठी मिळाले ३४ कोटींचे नवे चलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 01:04 AM2016-12-23T01:04:32+5:302016-12-23T01:04:32+5:30
बँकांना आज वितरण : व्यवहारांना मिळणार गती; ग्राहकांच्या रांगा कायम
कोल्हापूर : दोन आठवड्यांनंतर रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांसाठी गुरुवारी सुमारे ३४ कोटी रुपयांचे नवीन चलन मिळाले. त्याचे वितरण आज, शुक्रवारी दुपारपर्यंत बँकांच्या शाखांना होईल. नवे चलन मिळाल्याने बँकांमधील व्यवहारांना शुक्रवारपासून गती मिळणार आहे.
जुन्या ५०० व १००० च्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४५ दिवस उलटले आहेत; पण बॅँकांतून पैसे मिळण्याची स्थिती फार सुधारलेली नाही. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील विविध बँकांच्या करन्सी चेस्टला पाच ते १० कोटी रुपयांचे चलन मिळाले होते. या दरम्यानच नोकरदारांचे वेतन आणि सेवानिवृत्तीची पेन्शनदेखील बँकांमध्ये जमा झाली होती. त्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढला. या तुलनेत उपलब्ध चलन कमी असल्याने बँकांनी पैसे देण्याची मर्यादा कमी केली. पुरेसे चलन उपलब्ध व्हावे यासाठी करन्सी चेस्टकडून प्रयत्न सुरू झाले; पण नव्या चलनासाठी त्यांना दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागली.
करन्सी चेस्टना गुरुवारी दुपारी सुमारे ३४ कोटींचे चलन प्राप्त झाले. यामध्ये काही प्रमाणात नाणीदेखील आहेत. सायंकाळपर्यंत चलन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली.
चलन मिळाल्याने बहुतांश बँकांना आर्थिक स्वरूपातील दिलासा मिळाला आहे. आज, शुक्रवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांच्या शाखांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात या चलनाचे वितरण होईल. चलन मिळाल्याने बँकांमधील व्यवहारांची गती वाढणार असून, काही बँकांची एटीएमही सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चलन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पैसे काढण्यासाठी बँकांमधील गर्दी आणि सुरू असलेल्या एटीएमबाहेरील रांगा गुरुवारीही कायम होत्या. (प्रतिनिधी)
‘सीडीएमए’द्वारे पैसे स्वीकारणे बंद
जिल्ह्यातील काही बँका आपल्या सीडीएमए यंत्राच्या माध्यमातून रद्द झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा करून घेत होत्या; पण गेल्या तीन दिवसांत या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या सूचना लक्षात घेऊन काही बँकांनी आपल्या शाखांमध्येच रद्द नोटा जमा करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच त्यांनी विविध ठिकाणी असलेली आपली सीडीएमए यंत्रे बंद ठेवली आहेत. त्यामुळे नागरिकांना आता रद्द झालेल्या नोटा बँकेमध्येच जमा कराव्या लागणार आहेत.पोलिस प्रशासनाकडून आढावा
जिल्ह्यातील विविध बँकांकडे उपलब्ध असलेले चलन व जमा झालेले चलन, आदी स्वरूपांतील माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने बुधवारी घेतली आहे.
४कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने संबंधित स्वरूपातील माहिती घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.