सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार, ४९ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 11:26 AM2022-01-13T11:26:39+5:302022-01-13T11:27:09+5:30
सर्वसामान्यांचा आधारवड असणाऱ्या सीपीआरमधील रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार असून अनेक शस्त्रक्रियाही पुन्हा पुढे जाणार आहेत.
कोल्हापूर : शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ३४ डॉक्टर प्राध्यापकांना पुन्हा सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हजर होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा आधारवड असणाऱ्या सीपीआरमधील रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार असून अनेक शस्त्रक्रियाही पुन्हा पुढे जाणार आहेत.
पंधरवड्यापूर्वीच कोकणात गेलेले डॉक्टर्स पुन्हा सीपीआरमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे पंधरा दिवस पुढे गेलेल्या शस्त्रक्रियांचे वेळापत्रक ठरवून त्यानुसार त्या केल्या जात होत्या. तातडीच्या शस्त्रक्रिया वगळून इतर रुग्णांना फोन करून बोलावून शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र, आता पुन्हा हे ३४ डॉक्टर्स कोकणात जाणार असल्यामुळे आता या शस्त्रक्रियाही रखडणार आहेत. एकाच महाविद्यालयाच्या तपासणीच्या निमित्ताने ३४ डॉक्टर्सना पाचव्यांदा कोल्हापूरच्या डॉक्टरांना पाठवून कोल्हापूरवर महाविकास आघाडीचे नेते अन्याय का करत आहेत, अशी विचारणा होत आहे.
आतापर्यंत गेल्या दहा दिवसांमध्ये चार वैद्यकीय अधिकारी, चार प्राध्यापक, १७ वैद्यकीय कर्मचारी, १६ निवासी डॉक्टर्स आणि आठ अन्य डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स बाधित झाले आहेत. प्राध्यापक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निवासी डॉक्टर्स कार्यरत असल्याने आणि हेच मोठ्या प्रमाणावर बाधित असल्याने सीपीआरच्या रुग्णसेवेवरही परिणाम झाला आहे. आता तर हे ३४ प्राध्यापकही पाचव्यांदा पुन्हा राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेसाठी सिंधुदुर्गला जाणार असल्याने येथे रुग्णांना सेवा देणेच अवघड होणार आहे.
काय आहे सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रकरण
भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करून त्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटनही केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही शासकीय महाविद्यालय मंजूर केले परंतु मुलभूत सोयी, सुविधा आणि मनुष्यबळ नसल्याने राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रम सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. तुम्ही पुढच्या वर्षासाठी प्रस्ताव द्या, असे स्पष्टपणे शासनाला कळविले आहे; परंतु तरीही राजकीय इर्ष्येपोटी पुन्हा तपासणी लावण्यात आली असून यासाठी पुन्हा कोल्हापूरच्या डॉक्टरांना तात्पुरते नियुक्त करण्यात आले आहे.
सीपीआरमधील डॉक्टरांसह ४९ जणांना कोरोनाची बाधा
गेल्या दहा दिवसांमध्ये सीपीआरमधील चार वैद्यकीय अधिकारी, चार प्राध्यापक, १७ वैद्यकीय कर्मचारी, १६ निवासी डॉक्टर आणि आठ अन् डॉक्टर अशा ४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याचा सीपीआर रुग्णसेवेवरही परिणाम झाला आहे. त्यात पुन्हा ३४ प्राध्यापकही सिंधुदुर्गला जाणार असल्याने येथे रुग्णांना सेवा देणे कठीण होणार आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कक्ष देणार आहेत का? असा सवाल केला जात आहे.
बुधवारी संध्याकाळी ३४ डॉक्टर्सना कार्यमुक्त केल्याचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे हे सर्वजण सिंधुुदुर्गला जाणार आहेत. सीपीआरमधील अनेक डॉक्टर्स कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे मिरज, पुणे आणि सोलापूर येथून डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. - डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर