जमाअत-ए-इस्लामी हिंदकडून बांधून दिली ३४ घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:26+5:302021-03-13T04:42:26+5:30

हॅलोला अँकर करावा लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कनवाड (ता. शिरोळ) येथील महापूरामध्ये घरे व संसार मोडून पडलेल्या गोरगरीब ...

34 houses built by Jamaat-e-Islami Hind | जमाअत-ए-इस्लामी हिंदकडून बांधून दिली ३४ घरे

जमाअत-ए-इस्लामी हिंदकडून बांधून दिली ३४ घरे

Next

हॅलोला अँकर करावा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कनवाड (ता. शिरोळ) येथील महापूरामध्ये घरे व संसार मोडून पडलेल्या गोरगरीब ३४ कुटुंबाना जमाअत-ए-इस्लामी हिंद या संस्थेकडून सुमारे दीड कोटीहून अधिक रक्कम खर्च करून अतिशय टुमदार घरे वर्षाच्या आत बांधून देण्यात आली आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.१४) आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष रिचवानुर्रहमान खान यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ च्या महापुराने प्रचंड नुकसान केले. त्यात शिरोळ तालुक्यातील शेती,घरांचे नुकसान जास्त झाले आहे. या संकटात ज्यांची घरे पडली, त्यांना कायमस्वरूपी उत्तम सावली देण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद ही संस्था धावून आली. संस्थेने त्या कनवाडला जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. त्यामध्ये १२० घरांचे जास्त नुकसान झाल्याचे लक्षात आले. त्यातील ४० घरांच्या उभारणीची जबाबदारी संस्थेने स्वीकारली. परंतु सहा घरांना जागा व अन्य काही कायदेशीर अडचणी आल्याने त्यांचे बांधकाम करता आले नाही. उर्वरित ३४ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. ही घरे बांधून देण्यासंबंधीचा करार संस्था व जिल्हा परिषदेमध्ये २६ जानेवारी २०२० ला झाला होता. त्यावेळी वर्षात घरे बांधून देण्याचे नियोजन होते. परंतु कोरोनामुळे थोडा विलंब झाला. परंतु घराच्या बांधकामामध्ये कुठेही तडजोड न करता अतिशय चांगल्या दर्जाची घरे बांधून देण्यात आली आहे. सरपंच डॉ. बाबासाहेब अरसगोंडा व सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने लोकार्पण समारंभ होत आहे. घरे सुध्दा ग्रामपंचायतींची रितसर परवानगी घेऊनच बांधण्यात आली आहेत.

अशी आहेत घरे..

एकूण घरे : ३४

सरासरी एका घरावरील खर्च : ३ लाख ८० हजार

प्रत्येकी एक घर : ३५० चौरस फूट (वनरूम किचन व संडास-बाथरूम)

प्रत्येक कुुटुंबासाठी : तिजोरी, कॉट गादीसह प्रापंचिक साहित्य : ५० हजार रुपये

गरज हाच धर्म

कनवाड हे शिरोळपासून दहा किलोमीटरवर असलेले छोटेस गाव. तिथे मुस्लीम बांधव जास्त असले तरी घरे देताना गरजू कोण आहे याचा विचार करूनच सर्वधर्मीय बांधवाना ती देण्यात येत असल्याचे संघटनेच्या समाजसेवा विभागाचे राज्य सचिव मझहर फारुक यांनी सांगितले.

फोटो : ११०३२०२१-कोल-कनवाड घरे

शिरोळ तालुक्यातील कनवाड येथे जमाअत-ए-इस्लामी हिंद या संस्थेकडून महापुरात ज्यांची घरे पडली होती अशा गोरगरीब गरजूंना अशी टुमदार घरे बांधून देण्यात आली आहेत.क

Web Title: 34 houses built by Jamaat-e-Islami Hind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.