आजरा साखर कारखान्यातील बेअरींग चोरी प्रकरणात ७ अधिकाऱ्यांसह ३४ जण दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 04:42 PM2022-05-09T16:42:49+5:302022-05-09T19:12:05+5:30
समितीच्या अहवालानंतर कर्मचारी वर्गासह सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली.
सदाशिव मोरे
आजरा : आजरा साखर कारखान्यातील सहा बेअरींग चोरी प्रकरणात सात अधिकाऱ्यांसह ३४ जणांना दोषी ठरविले आहे. चौकशी समितीने आज, सोमवारी आपला अहवाल संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला. समितीच्या अहवालानंतर कर्मचारी वर्गासह सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली.
साखर कारखान्यातून सन २०१८ - २०१९ चा गळीत हंगाम १७ फेब्रुवारी २०१९ रोजी समाप्त झाला. त्यानंतर २६ जुलै २०२१ पर्यंत आजरा कारखान्यातील २७० किलोच्या ४ व ९२ किलो वजनाच्या २ अशा एकूण ६ बेअरींग चोरीला गेल्याची फिर्याद प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी आजरा पोलिसात दिली. त्याअनुषंगाने साखर कारखान्याने चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने आज संचालक मंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला. यात प्रशासन प्रमुख, आजी-माजी सुरक्षा अधिकारी, जमादार, वॉचमन व स्टोअरचे ७ अधिकाऱ्यांसह ३४ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आहे.
..बेरिंगची नेमकी रक्कम किती?
संचालकांच्या बैठकीत ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर यांनी या एका बेअरींगची किंमत ७ लाख असून एकूण ४२ लाखांच्या बेअरींग चोरीला गेल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष शिंत्रे व केसरकर यांच्यात बेअरींगच्या रक्कमेवरुन जुगलबंदी उडाली. त्यामुळे नेमकी ६ बेअरींगची रक्कम किती? व बेअरींगसोबत आणखीन काय चोरीला गेले याबाबत अद्याप संदिग्धता आहे.