जिल्हा परिषदेत ३४ सदस्यांचे पाठबळ; भाजपचा दावा
By admin | Published: March 5, 2017 12:31 AM2017-03-05T00:31:00+5:302017-03-05T00:31:00+5:30
शिवसेनेला वगळून अपेक्षित संख्याबळ
मिरज : जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादीच्या अपक्षाशी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांची चर्चा सुरू असून, शिवसेनेला वगळून आपल्याकडे ३४ सदस्यसंख्या असल्याचा दावा शनिवारी मिरजेतील बैठकीनंतर देशमुख यांनी केला.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. एकूण ६० सदस्य असून, सत्तास्थापनेसाठी ३१ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपकडे २५ सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर मिरजेतील एका फार्म हाऊसवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख, खा. पाटील, आमदार सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, राजाराम गरूड, दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर यांच्यासह जिल्हा परिषदेत निवडून आलेले भाजपचे सर्व २५ सदस्य उपस्थित होते. खा. पाटील यांच्याहस्ते सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह मिरज, पलूस, कडेगाव, जत, आटपाडी, पंचायत समितीत सत्ता स्थापण्याबाबत बंद खोलीत चर्चा झाली.
बैठकीनंतर पत्रकारांनी विचारले असता, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, शिवसेनेचे तीन सदस्य वगळूनही आमच्याकडे ३४ सदस्य असल्याने भाजपचा अध्यक्ष निश्चित आहे. रयत विकास आघाडीचे चारही सदस्य आमच्याबरोबर आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, अपक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. बहुमत सिध्द करण्यासाठी काहीही अडचण निर्माण होणार नाही. जिल्हा परिषदेत आम्ही ३४ ते ३५ सदस्य संख्येपर्यंत निश्चित पोहोचणार आहेत. तेथे भाजपचे कमळ फुललेले दिसेल.
ते म्हणाले की, सध्या पंचायत समित्यांतील सभापती निवडीला प्राधान्य दिले आहे. पलूस, कडेगाव, आटपाडी पंचायत समितीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे तेथील सभापती व उपसभापती निवडी बिनविरोध होतील. जत, मिरजेत काठावरचे बहुमत असले तरी, अन्य पक्षातील सदस्य आमच्या संपर्कात असून, त्यांच्या मदतीने तेथील सभापती, उपसभापतीही आमचाच होईल.
कोअर कमिटीची १५ ला बैठक
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पुन्हा दि. १५ मार्च रोजी होणार आहे. या बैठकीत पाठिंबा देणाऱ्या मित्र पक्ष, संघटना, आघाड्यांची नावे निश्चित होणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची नावे निश्चित होण्याबरोबरच अन्य ४ सभापतींची पदे ठरविण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या अपक्षासोबत बोलणी
बागणी (ता. वाळवा) गटातून राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे निवडून आले आहेत. भाजपच्या पाठिंब्यासाठी कचरे यांच्याशी पृथ्वीराज देशमुख, खासदार पाटील चर्चा करीत आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांच्या पाठिंब्याचा फैसला होईल, असे आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले. याबाबत कचरे यांच्याशी संपर्क साधला असता, भाजप व काँग्रेसचे नेते संपर्कात असून, त्यांना कोणताही निर्णय दिला नाही. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अद्याप विचारले नसल्याचेही कचरे यांनी सांगितले.