पावसाच्या तांडवामुळे विजेची ३४० रोहित्रे बंद; नऊ हजार २०० ग्राहकांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:12 PM2020-09-09T20:12:54+5:302020-09-09T20:15:07+5:30
मंगळवारी (दि. ८) रात्री पावसाने घातलेल्या तांडवामुळे वीजपुरवठा करणारी ३४० रोहित्रे बंद पडली. बंद झालेला वीजपुरवठा महावितरणने बुधवारी दुपारपर्यंत अथक प्रयत्नांनी पूर्ववत केला. जिल्ह्यातील नऊ हजार २०० ग्राहकांना खंडित विजेचा फटका सोसावा लागला.
कोल्हापूर : मंगळवारी (दि. ८) रात्री पावसाने घातलेल्या तांडवामुळे वीजपुरवठा करणारी ३४० रोहित्रे बंद पडली. बंद झालेला वीजपुरवठा महावितरणने बुधवारी दुपारपर्यंत अथक प्रयत्नांनी पूर्ववत केला. जिल्ह्यातील नऊ हजार २०० ग्राहकांना खंडित विजेचा फटका सोसावा लागला.
ढगफुटीसारख्या पावसाने मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत विजांच्या लखलखाटासह अक्षरश: झोडपून काढले. तुफानी पाऊस, साचत चाललेले पाणी आणि विजांमुळे दक्षता म्हणून महावितरणने सबस्टेशनवरील वीज काही काळासाठी खंडित केली होती. पावसाचा जोर ओसल्यानंतर ती पूर्ववत सुरू केली. पाण्यामुळे बिघाड झालेली रोहित्रे बुधवारी सकाळी तातडीने दुरुस्तीस घेतली. ९४ गावे व परिसरातील वीज पूर्णपणे खंडित झाली होती. ती बुधवारी दुपारपर्यंत पूर्ववत झाली.
कडाडणाऱ्या विजा आणि पाण्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सबस्टेशन बंद ठेवण्याची आम्ही दक्षता घेतली. त्यामुळे महावितरणचे फारसे नुकसान झाले नाही. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करता आला.
- प्रशांत मासाळ,
कार्यकारी अभियंता, कोल्हापूर परिमंडल
आपत्ती व्यवस्थापन कार्यालयावरच आपत्ती
जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन हाताळणारे जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालयही रात्रभर अंधारात होते. दुपारी बाराच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाला सुरुवात झाली. आपत्ती कार्यालयातील सर्व यंत्रणा बंद असल्याने पावसाचा अहवालही दुपारनंतरच प्रसिद्धीस देण्यात आला.