जिल्ह्यातील तब्बल ३४८ शाळांवर गंडांतर येणार
By admin | Published: December 11, 2015 11:30 PM2015-12-11T23:30:09+5:302015-12-12T00:03:43+5:30
२० पटाखालील शाळांचा प्रश्न : एक पटाच्या दोन शाळा, वेतन खर्च ५० हजार
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर--जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जिल्ह्यातील एकूण २००५ पैकी ३४८ प्राथमिक शाळा २० पटसंख्येच्या आतील आहेत. या शाळांवर त्या बंद करण्याचे गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्याने शिक्षण क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन शिक्षकांवरील खर्च टाळून २० पटाखालील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत पोहोचविण्यावर पैसे खर्च करणे योग्य होईल. यामुळे वेतनाच्या खर्चात कपात होईल, असा पर्याय चर्चेला येत आहे.गुरुवारी (दि. १०) शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २० पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती दिली. ते म्हणाले, राजकारणापलीकडे जाऊन या शाळांसंबंधी निर्णय घेण्यास सहकार्य केले पाहिजे. दरम्यान, नोकरी-व्यवसायानिमित्त शहरातील वास्तव्य, पालकांचा पाल्याला इंग्रजी शाळेत घालण्याचा वाढता कल, जिल्हा परिषदेच्या काही शाळांतील घसरलेली गुणवत्ता, प्राथमिक शिक्षकांचे शिकविण्यापेक्षा विमा एजंट, राजकारण यावरील विशेष लक्षामुळे अध्यापनाकडे होणारे दुर्लक्ष, आदी कारणांमुळे पटसंख्या घटते आहे. अनेक प्राथमिक शाळांतील शिक्षकांची मुलेही खासगी शाळेत जात आहेत. दुर्गम, डोंगराळसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रत्येक मुलास शिक्षण मिळावे, हा उद्देश असल्यामुळे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून द्विशिक्षकी शाळा सुरू आहेत. २० पटाखालील सर्व शाळा द्विशिक्षकी आहेत. प्राथमिक शिक्षण प्रशासनाने केलेल्या पाहणीमध्ये जिल्ह्यात ३४८ शाळांत २० पटाच्या आत विद्यार्थी आहेत. कवलटेक (ता. गगनबावडा) आणि मिकाळ (ता. चंदगड) येथील विद्यामंदिर शाळेत एकच विद्यार्थी आहे. तरीही येथे दोन शिक्षक आहेत. ३४८ मधील निम्म्यापेक्षा अधिक शाळांमध्ये १५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. काही कारणांनिमित्त एखादा दिवस एकही विद्यार्थी शाळेला न आल्यास शिक्षक मात्र उपस्थित असतात. विद्यार्थीच नसल्यामुळे त्यांना विनाअध्यापन जावे लागते. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, राधानगरी, चंदगड, भुदरगड या तालुक्यांतील शाळा २० पटांच्या आतील अधिक आहेत. अन्य तालुक्यांतील केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या शाळा २० पटातील आहेत.२० पटाखालील शाळा बंद करण्याचा विषय आल्यानंतर शिक्षक संघटनांचा विरोध सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा अतिरिक्त शिक्षक होणार, हा विरोध करणाऱ्यांचा छुपा ‘अजेंडा’ जगजाहीर झाला आहे. त्यामुळेच या विरोधाला पालक व अन्य घटकांचा पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे.
१०६ शाळांत फक्त
दहा विद्यार्थी...
जिल्ह्यातील तब्बल १०६ शाळांमध्ये प्रत्येकी फक्त दहा विद्यार्थी आहेत. दोन ते चार विद्यार्थी असलेल्या आठ, पाच ते सहा विद्यार्थी असलेल्या २५, सात विद्यार्थी असलेल्या २०, आठ विद्यार्थी असलेल्या १३, नऊ विद्यार्थ्यांच्या ११, दहा पटाच्या २६, अकरा पटाच्या ३८, बारा पटाच्या २७, तेरा पटाच्या ३६, चौदा पटाच्या ३३, उर्वरित १५ ते २० पटांच्या २५ शाळा आहेत.
६९६ शिक्षक : दरमहा साडेतीन कोटी वेतन
सहाव्या वेतन आयोगानुसार दोन शिक्षकांचा दर महिन्याचा कमीत कमी पगार महिन्याला ५० हजार आणि सेवा अधिक झाल्यास ७५ हजार होतो. २० पटाच्या आतील शाळेत सध्या दोन शिक्षक याप्रमाणे ३४८ शाळांमध्ये ६९६ शिक्षक आहेत. कमीत कमी दोन शिक्षकांचे ५० हजार रुपयांप्रमाणे ६९६ शिक्षकांचे दरमहा ३ कोटी ४८ लाख रुपये वेतन शासन देते. वेतनावर इतका खर्च करण्यापेक्षा २० पटाखालील शाळा बंद करायच्या. त्या शाळांतील मुलांना जवळच्या शाळेत जाण्या-येण्याची मोफत सुविधा द्यायची किंवा निवासी शाळेत दाखल करायचे, अशा पर्यायांचा विचार केला जात आहे.
२० पटाखालील शाळांसंबंधी राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही नवीन, स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. - सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी