कोल्हापूर जिल्ह्यात ३५ बालविवाह उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:55 AM2018-12-31T00:55:03+5:302018-12-31T00:55:23+5:30
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, ...
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, मुलींची असुरक्षितता व बदनामी रोखण्यासाठी बालविवाहाचे चुकीचे पाऊल उचलले जात आहे. वर्षभरात ‘चाईल्ड लाईन’ने बालविवाहाची ३५ प्रकरणे उघडकीस आणली असून, हे प्रमाण ग्रामीण भागात व शहरातील झोपडपट्टी परिसरात अधिक आहे.
कोल्हापुरात नुकतीच बालविवाहाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांचे प्रबोधन आणि कायदा करूनही बालविवाह रोखण्यात व्यवस्थेला यश आलेले नाही. यामागील कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न ‘चाईल्डलाईन’ने केला आहे. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ अशी एक म्हण आहे; कारण वय वर्षे १४ ते १७ या कालावधीत मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात.
या किशोरावस्थेत मुला-मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटत असते. त्यातून दोघांचेही चुकीचे पाऊल पडते. पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतच्या गोष्टी घडतात. असे काही घडू नये, आपल्या मुलीची व कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पालक स्थळ बघून मुलीचे लग्न
उरकून टाकतात. एकदा का मुलीचे लग्न झाले की आपण सुटलो, अशी पालकांची भावना असते.
अलीकडे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे वाढते प्रमाण पाहता लग्न करणे हा खबरदारीचा उपाय मानला जातो. हे प्रमाण ग्रामीण आणि
शहरातील झोपÞडपट्टी भागांत जास्त आहे.
शारीरिक,
मानसिकदृष्ट्याही अक्षम
पौगंडावस्थेत मुला-मुलींचा शारीरिक व मानसिक विकास झालेला नसतो. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यासाठी ते सक्षम नसतात. त्यामुळे या वयात झालेल्या विवाहानंतर दोघांवर अनेकदा पश्चात्तापाचीच वेळ येते. त्यामुळे शासनाने मुलींसाठी १८ आणि मुलांचे २१ हे सज्ञान वय धरले असून, त्या दृष्टीने ‘पोस्को’सारखे कायदे बनविण्यात आले आहेत. त्यात अडकले की दोघांचे आणि कुटुंबीयांचेही आयुष्य पणाला लागते.
समुपदेशन आणि सक्षमीकरण हाच उपाय
सगळ्या घटनांपासून मुलीला वाचवायचे असेल तर बालविवाहासारखे चुकीचे पाऊल उचलण्याऐवजी किशोरावस्थेतच मुला-मुलींचे समुपदेशन, या वयात होणारे बदल, भविष्यातील धोके, करिअर याविषयी कौटुंबिक, शाळा व महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांची यात महत्त्वाची भूमिका असते. मुलीचे शिक्षण आणि करिअरइतकेच प्रसंगी तिला समोर ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत, इतके सक्षमीकरण हा उपाय ठरणार आहे. मुलींनीही सावध राहिले पाहिजे. गरज वाटली तर समुपदेशनासाठी १०९८ या ‘चाईल्ड लाईन’च्या क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे, असे मत समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी व्यक्त केले.
अत्याचारांचे
वाढते प्रमाण
एकीकडे स्त्री-पुरुष समानतेसाठी शासन व सामाजिक संस्थांकडून प्रबोधन आणि प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे भेदाभेदांची दरी वाढत चालल्याचे चित्र आहे. लहान मुलींपासून ते युवती, महिलांवर होणाºया अत्याचाराचा वाढता आलेख आहे. छेडछाड, पाठलाग करणे, टवाळखोरी, मुलीला असुरक्षित वाटेल अशी वर्तणूक, विनयभंग, बलात्कार, हत्या अशा घटनांमुळे ग्रामीणच नव्हे तर शहरातील पालकांमध्येही मुलीच्या असुरक्षिततेची भावना प्रचंड आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी लवकर लग्न करणे हा उपाय मानला जातो.