३५ लाख नागरिक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2016 12:28 AM2016-10-07T00:28:37+5:302016-10-07T00:43:41+5:30

मराठा क्रांती मोर्चा : संयोजन समितीचा अंदाज; मुख्य व्यासपीठ दसरा चौक की ताराराणी चौक

35 lakh citizens will come | ३५ लाख नागरिक येणार

३५ लाख नागरिक येणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात सुमारे ३५ लाख नागरिक सहभागी होण्याची शक्यता गृहीत धरून दसरा चौक हे मोर्चाच्या मुख्य व्यासपीठाचे ठिकाण डोळ्यांसमोर ठेवून मोर्चा मार्ग, पार्किंग, आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. या नियोजनाचे कौतुक करीत ताराराणी चौकाचाही पर्याय म्हणून विचार करावा, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बैठकीत सुचविले. दहा दिवसांनी कोल्हापुरात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि मोर्चा कोअर कमिटी यांची गुरुवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयात बैठक झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे हेही या बैठकीस प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत तज्ज्ञांनी मते मांडली. मोर्चाचे मुख्य व्यासपीठ दसरा चौक की ताराराणी चौक याबाबत आज, शुक्रवारी निश्चिती करण्यात येणार आहे.
दसरा चौकातील ठिकाणाच्या मोर्चामध्ये होणारी कोंडी, ताराराणी चौकातील रुंद आणि लांब असणारे रस्ते विचारात घेता ताराराणी चौकाचाही मुख्य व्यासपीठ म्हणूनही पर्यायी विचार करण्यास हरकत नसल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. कोल्हापूरला मराठ्यांचा ऐतिहासिक वारसा असल्यामुळे परिक्षेत्रात निघालेल्या इतर मोर्चांपेक्षा कोल्हापुरातील मोर्चात महिला व मुलांची संख्या लक्षणीय असेल, असा विश्वासही नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीस शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, अनिल देशमुख, तानाजी सावंत, अमृत देशमुख, प्रवीण चौगुले, बिपीन हसबनीस, दिनकर मोहिते, ‘व्हाईट आर्मी’चे अशोक रोकडे, कोअर कमिटीचे राजू लिंग्रस, गणी आजरेकर, वसंतराव मुळीक, महेश जाधव, प्रशांत क्षीरसागर, सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.


परिक्षेत्रातील पोलिस यंत्रणा कोल्हापुरात
कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या भागांतील पोलिस यंत्रणा मागविण्यात आली आहे. याशिवाय एनसीसी आणि एनएसएसच्या मुलांचेही सहकार्य घेण्यात येईल, असेही नांगरे-पाटील यांनी सांगितले. याशिवाय शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रणही संयोजन समितीला करण्यास नांगरे-पाटील यांनी मान्यता दिली

पालकमंत्री स्वीकारणार निवेदन
कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सामोरे जाणार आहेत. १५ रोजी मोर्चादिवशी ते जिल्हाधिकारी कार्यालयात बसून मोर्चाच्या शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन स्वीकारणार असल्याचेही विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.


मोबाईल जॅम; ‘एफ एम’चा वापर
मोर्चावेळी सर्वांचे मोबाईल ‘हँग’ होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे स्वयंसेवकांना सूचना देताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून रेडिओ ‘एफएम’ची मदत घेण्यात यावी. परिक्षेत्रातील सर्व मोर्चांत मोबाईल यंत्रणा पूर्णत: बंद राहिल्यामुळे ‘एफएम’ची मदत घेण्यात आली होती, असेही नांगरे-पाटील यांनी सुचविले.


‘मोबाईल डॉक्टर’ संकल्पना राबविणार
सातारा येथे वैद्यकीय उपचारामध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेऊन क्षत्रिय मराठा मेडिको विभागाने प्रथमच कोल्हापुरात ‘मोबाईल डॉक्टर’ ही संकल्पना मांडली आहे. डॉक्टर मंडळी पाठीला औषध व उपचार साहित्य घेऊन सहभागी होतील. त्यात कोणालाही काही झाले तर तत्काळ त्याच्यावर उपचार करतील. या डॉक्टरांकडे मोर्चामध्ये सहभागी बांधवांचे लक्ष वेधण्यासाठी वेगळा ड्रेसकोड देण्यात येणार आहे. या संकल्पनेचे स्वागत व कौतुक सर्व उपस्थितांसह विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.


पार्किंगपासून तीन किलोमीटर पायी
शहरातील मध्यवस्तीतील रस्त्यांवर फक्त नागरिकच असतील. याशिवाय वाहनांच्या पार्किंगपासून नागरिकांना जास्तीत जास्त तीन किलोमीटर पायी जावे लागेल, याप्रमाणे नियोजन केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी यावेळी दिली.

Web Title: 35 lakh citizens will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.