शेतकरी संघाच्या शाखा दुरुस्तीवर ३५ लाखांची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:38+5:302021-03-20T04:21:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या कारभारी संचालकांचे कारनामे रोज बाहेर येत असून पाच शाखांची दुरुस्तीवर तब्बल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या कारभारी संचालकांचे कारनामे रोज बाहेर येत असून पाच शाखांची दुरुस्तीवर तब्बल ३५ लाख २७ हजार रुपयांची उधळपट्टी केली आहे. विशेष म्हणजे तेथील शाखाधिकाऱ्यांना अंधारात ठेवूनच या पैशांची उचल केल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
संघाला घरघर लागण्यात येथील खाबुगिरीच कारणीभूत ठरली असून गेल्या पाच वर्षात हे प्रमाण वाढले आहे. संचालक मंडळच त्याला खतपाणी घालत असल्याने काही कर्मचाऱ्यांचे फावले आहे. त्यातूनच गेल्या पाच वर्षात चार शाखांत तब्बल ४५ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. यावरून प्रशासनातील सावळा गोंधळ पहावयास मिळतो. शाहूनगर पेट्रोल पंपावरून २० लाख रुपयांचे पेट्राेल, डिझेल उधारीवर विक्री केली होती. त्याच्या वसुलीतून संबंधित व्यक्तींने चेक दिले मात्र ते वटलेले नाहीत. साबळेवाडी (ता. करवीर) येथील खत विक्रेत्याला तब्बल ४० लाखांचे खत उधारीवर दिले होते. यासाठी एका संचालकाची शिफारस होती. त्यातील २० लाखांचा माल परत केला असला तरी उर्वरित पैसे अडकले आहेत. कोणत्याही प्रकारची लेखी नाही, ज्या व्यवस्थापकामुळे हे घडले ते मात्र नामानिराळे राहिले आहेत. आता हे पैसे वसुलीसाठी लवादासमोर ठेवले आहे. हे दोन्ही प्रकार म्हणजे एक प्रकारचे अपहारच आहेत.
शाखा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे दिसते. डागडुजी म्हणजे पत्रा बदलणे, गिलावा करणे, फरशी बसवणे या कामासाठी चार लाखांपासून साडे नऊ लाखांपर्यंत शाखांवर खर्च टाकले आहेत. हे सगळे काम जेमतेम १६ लाखांपर्यंत होणे अपेक्षित असताना त्यावर ३५ लाख २७ हजार रुपये खर्च दाखवल्याने काही संचालकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
पेट्रोप पंप म्हणजे खजिना‘
संघाचे पेट्रोल पंप म्हणजे तडजोडीसाठीचा खजिनाच बनला आहे. पेट्रोल कंपन्यांना पैसे भरण्यासाठी नसल्याने तीन-चार दिवस पंप ‘ड्रा’ असतात, मात्र फिरवाफिरवीसाठी मात्र येथील पैसे वापरले जात असल्याने सभासदांमध्ये कमालीचा असंतोष आहे.
ज्येष्ठ संचालकांची तळमळ
संघाच्या चुकीच्या कारभारास सर्वच संचालक जबाबदार नाहीत, काहींनी या प्रकाराला उघड विरोध केला. एका ज्येष्ठ संचालकांनी ताकदीने विरोध करून अनेक व्यवहार थांबवले आहेत.
संघाच्या शाखांतील अपहार
शाखा अपहाराची रक्कम
पडळ ३,७८,७७२
लिंगनूर १६,३२८
शिरोळ ३६,७२,०००
पडळ ४,९७,०००