३५ गळक्या शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 10, 2017 01:08 AM2017-05-10T01:08:33+5:302017-05-10T01:08:33+5:30
करवीर तालुका : जिल्हा परिषदेस पाठविला प्रस्ताव; १५ जूनपर्यंत शाळा दुरुस्तीचे टार्गेट
रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क --कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जि. प.च्या ३५ गळक्या शाळा सध्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत करवीर पंचायतीकडून जि. प.ला शाळा दुरुस्त करून मिळाव्यात म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अजून शाळा दुरुस्तीच्या हालचाली सुरू नाहीत.
करवीरमध्ये जि. प.च्या सर्वांत जास्त १८३ शाळा आहेत. या शाळेत सुमारे २९ हजारांच्यावर विद्यार्थ्यांची संख्या आहे. बहुतेक शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांच्या संख्येने खचाखच भरलेले असतात; परंतु पावसाळ्यात शाळांचे छत गळू लागले की, या विद्यार्थ्यांचे हाल सुरू होतात. काही वेळा शाळेतील दलदलीमुळे मुले आजारी पडतात. हे प्रत्येक वर्षीचे चित्र आहे. यंदाही अशी स्थिती उद्भवू नये म्हणून करवीर पंचायत समितीने शाळांची दुरुस्ती करून मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला आहे.
शाळांच्या छताची कौले खराब होणे, काही वेळेला वादळी वाऱ्यांमुळे कौले उडून जाणे, शाळांच्या भिंती कोसळणे, फरशा उखडून पडणे, दरवाजे मोडलेल्या अवस्थेत असणे, अशा प्रकारे शाळांची दुरवस्था होेते. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती दिलेली असते; परंतु त्यातून पुढे काहीही निर्णय होत नसल्याचा शाळांना अनुभव आहे.
सध्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा व सर्व शिक्षा अभियानामधून या शाळांची दुरुस्ती व्हावी म्हणून प्रस्ताव केला आहे. त्यासाठी सुमारे ३५ ते ४० लाख रुपये निधीची गरज भासणार असल्याचे समजते. साधारणत: जानेवारी व फेब्रुवारीमध्ये असे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, शाळा दुरुस्त करून मिळाव्यात म्हणून पंचायत समितीकडून पाठविलेले जि. प.कडील प्रस्ताव जिल्हा परिषद जिल्हा नियामक मंडळाकडे पाठवून त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याची माहिती देते. त्यानुसार निधी उपलब्ध झाल्यावर शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात; परंतु प्रत्येक वर्षी मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होत नसल्याचा अनुभव आहे.
प्रस्ताव जास्त, अनुदान कमी
शाळा दुरुस्तीसाठी जि. प.कडे तालुक्यातून अनेक प्रस्ताव येतात; परंतु त्या पटीत संबंधित विभागाकडून अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी अनेक शाळांची कामे अर्धवट अवस्थेत राहतात.
करवीर पंचायतने जि. प.कडे शाळा दुरुस्तीसाठी पाठविलेला प्रस्ताव व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. यंदा कसल्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही.
- प्रदीप झांबरे, सभापती, करवीर पंचायत समिती.
येत्या १५ जूनपर्यंत शाळा दुरुस्ती करून घ्या, असा आदेश शाळांना दिला आहे. त्यानुसार शाळांची वेळेत दुरुस्ती होईल. निधीची कमतरता भासणार नाही.
- राजेंद्र भालेराव, गटविकास अधिकारी,
करवीर पंचायत समिती.