कोल्हापूर जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू, अडीच महिन्यातील आकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:50 PM2018-03-19T12:50:12+5:302018-03-19T12:50:12+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.
जिल्ह्यात नदी, तलाव, विहीरीमध्ये अंघोळीसाठी पोहायला गेलेल्या अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या काही तरुण परत घरी परतले नाहीत. पाण्याची खोली, पोहण्याचा सराव नसल्याने अडीच महिन्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झाला.
सध्या मार्च-एप्रिल महिना सुरु आहे. उष्म्याचे प्रमाण वाढते आहे. परिक्षा संपल्यानंतर कॉलेज युवक, शाळेच्या मुलांचा नदी, तलाव, विहीरीकडे पोहण्याचा कल जास्त असतो. त्यामुळे एप्रिल-मे या दोन महिन्यात बुडून मृत्यू पावलेल्यांची संखा जास्त असते. त्यामुळे युवक, मुले, त्यांच्या पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
पोहायला येत असेल तरच मुलांना स्विमींग टँकमध्ये सोडावे, नदी, विहीर, तलावामध्ये गाळ साचलेला असतो. उत्साही तरुण, मुले वरुन उड्या मारतात. अशावेळी गाळात अडकण्याची भिती जास्त असते. पोहताना पाठशिवीणीचा खेळ, बॉलने पाण्यात खेळणे अशा गेमही जिवीतास धोका ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देवून त्यांना तलाव, विहीरीवर अंघोळ करण्यास मनाई करणे गरजेचे आहे.
युवक आपल्या साहसाचा अतिरेक करीत आहेत. त्यांनी तो करू नये. नद्या, विहीरी, तलाव आदी ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडू लागल्या आहेत. प्रत्येकाने आपली मागे कोणीतरी काळजी करीत आहे, याचे भान ठेवावे.
दिनकर कांबळे,
जीवरक्षक
- अंगावर जड कपडे घालून पोहण्यास उतरु नये
- ज्या ठिकाणी पोहायला जाता त्या तलाव, नदी किंवा विहीरीच्या खोलीचा अंदाज घ्यावा.
- वयानुसार पोहण्याचा सराव किती आहे, तितकेच पोहणे गरजेचे आहे.
- पाण्यात कोणताही गेम खेळू नका.
- पोहण्याच्या ठिकाणी तरंगणारे कॅन, दोरी, बांबू ठेवावा, जेणेकरुन एखाद्याचा जीव वाचविता येईल.
- ४५ मिनीटाच्या वर पाण्यात थांबु नये.
- घरच्या लोकांना सांगुन पोहण्यास जावे.
- पोहायला येत असेल तरच पाण्याजवळ जावे.