‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळ्यासाठी ‘अन्नछत्र’सह ३५ टीम रायगडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 07:13 PM2019-06-03T19:13:03+5:302019-06-03T19:17:19+5:30
अखिल भारतीय ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा समितीतर्फे ५ व ६ जूनला रायगडावर ३४६ वा ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा केला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी दुपारी अन्नछत्राची टीम दोन ट्रक भरून साहित्य घेऊन, तर रात्री समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली ३५ विविध समित्यांचे पदाधिकारी रवाना झाले.
कोल्हापूर : अखिल भारतीय ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा समितीतर्फे ५ व ६ जूनला रायगडावर ३४६ वा ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा केला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी दुपारी अन्नछत्राची टीम दोन ट्रक भरून साहित्य घेऊन, तर रात्री समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली ३५ विविध समित्यांचे पदाधिकारी रवाना झाले.
खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली व युवराज्ञी संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. सोहळ्यासाठी २५०० मावळ्यांच्या विविध समित्या स्थापन केल्या असून, प्रत्येकावर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
सोमवारी सायंकाळी भवानी मंडप येथून संयोगिताराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नछत्राचे साहित्य असलेले दोन ट्रक घेऊन ३०० स्वयंसेवक रवाना झाले. त्याचबरोबर रात्री अकराच्या सुमारास विविध ४० समित्यांचे पदाधिकारी पुढील तयारीसाठी रायगडकडे रवाना झाले. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व पदाधिकाऱ्यांकडून मंगळवारी पाचाड येथील मैदानावर जाऊन पाण्याच्या व्यवस्थेबाबत पाहणी करणार आहेत.
सायंकाळी गडावर जाऊन येथील तयारीची पाहणी केली जाणार आहे. गडावर पाण्याची व्यवस्था करून टाक्या बसविण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. मुख्य सोहळ्यासाठी मंडप उभारण्यात आले आहे. राज्यासह देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
५ जूनला गडपूजन व ६ जूनला मुख्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी साडेतीन हजारांपेक्षा अधिक वाहनांसाठी टोल फ्रीच्या स्टीकरचे वाटप झाले आहे. नोंदणी झाली आहे. अजूनही नोंदणीचा ओघ वाढत असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
शिवभक्त मंगळवारी रवाना होणार
विविध समित्यांचे पदाधिकारी सोहळ्याच्या तयारीसाठी सोमवारी रायगडावर रवाना झाले. तर मंगळवारी रात्री दहानंतर शिवभक्त रवाना होणार आहेत. समितीतर्फे दसरा चौकातून ५० आसनी १५ आरामबसची व्यवस्था केली आहे, तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खासगी चारचाकी वाहनांमधूनही शिवभक्त रवाना होणार आहेत.
रायगड परिसरात आठ चौक्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच सोहळा समितीतर्फे आठ चौक्या उभ्या केल्या आहेत. यापैकी चार गडावर, तर चार गडाच्या पायथ्याशी व परिसरात असणार आहेत. प्रत्येक चौकीत दोन स्वयंसेवक, एक डॉक्टर, एक आपत्ती निवारण पथकाचा जवान, पार्किंग व्यवस्थेसाठी एक स्वयंसेवक, अशी रचना करण्यात आली आहे.