८५ धोकादायक इमारतींत ३५० रहिवासी; मरण्याची हौस नाही पण..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:28+5:302021-06-04T04:18:28+5:30
कोल्हापूर : ‘नेमेची येता पावसाळा’ या उक्तीप्रमाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील धोकादायक इमारतींना प्रत्येक वर्षी नोटीस दिली जाते, पण त्या ...
कोल्हापूर : ‘नेमेची येता पावसाळा’ या उक्तीप्रमाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील धोकादायक इमारतींना प्रत्येक वर्षी नोटीस दिली जाते, पण त्या इमारती उतरून घेण्याच्या दृष्टीने फारसे गांभिर्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहरात सध्या ८५ धोकादायक इमारतीतून ३५० च्या वर नागरीक राहतात, पण त्यांनीही आपल्या जीविताकडे दुर्लक्ष केल्याचे त्यातून स्पष्ट होते.
धोकादायक इमारतीत राहण्याची हौस तशी कोणालाच नाही, परंतु अनेक वर्षांपासूनचा कब्जा सोडायचा नाही ही कुळाची मानसिक आणि इमारतींचा पुनर्विकास करण्याची मालकाची ऐपत नाही, अशा विचित्र परिस्थितीमुळे शहरातील धोकादायक इमारतींचे अस्तित्व राहिले आहे. कधी तरी एखादी दुर्घटना घडली तरच याबाबत कडक धोरण राबविले जाईल, अशी आजची स्थिती आहे.
- शहरातील धोकादायक इमारती - ८५
- इमारतींमध्ये राहणाऱ्यांची संख्या - ३५०
- सारे काही कळते, पण कुठे जाणार?
अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुळांना जुन्या इमारतीतून बाहेर पडायला नको असते. त्यांनी त्या इमारतीचा कब्जा केलेला आहे. धोकादायक इमारतीची नोटीस मालकाला लागू होते हे कुळांना माहीत आहे. तसेच इमारत किती धोकादायक आहे, ती पडेल की नाही याचाही अंदाज बांधतात. त्यामुळे सारे काही कळूनही आम्ही जाणार कुठे, अशी विचारणा कुळांकडून केली जाते.
स्वत: घरमालक तक्रारदार -
शहरातील ज्या काही इमारती धोकादायक म्हणून महापालिका दप्तरी नोंद आहेत. त्यापैकी एखाद दुसरीच अतिधोकादायक असावी तसेच अशा इमारतीतील काही भाग मोडकळीस आला आहे. वर्षानुवर्षे राहणारी कुळे जावीत म्हणून पालिकेकडे आमची इमारत धोकादायक असून ती उतरून घ्यावी असे अर्ज येतात. त्यामुळे पाहणी केल्यानंतर धोकादायक भाग उतरून घेण्याची नोटीस दिली जाते, असे पालिका अधिकाऱ्यांऱ्याकडून सांगितले जाते.
वारंवार दिल्या नोटिसा -
शहरातील धोकादायक इमारतींना आम्ही प्रत्येक वर्षी नोटीस देऊन धाेकादायक भाग उतरून घ्या अशा प्रकारची नोटीस देतो. परंतु अनेक इमारतीतील मालक आणि कूळ यांचे वाद न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे वारंवार नोटीस देऊनही न्यायप्रविष्ट बाब असल्याने धोकादायक भाग उतरुन घेण्यात अडचणी येतात, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
- इमारत पडल्यास जबाबदार कोण?
न्यायप्रविष्ट बाब, कुळांचा इमारतीत राहण्याचा अट्टहास यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरात धोकादायक इमारतींचे अस्तित्व आहे. सुदैवाने आतापर्यंत अशा इमारती कोसळल्याचे तसेच त्यात मनुष्यहानी झाल्याचा प्रकार घडलेला नाही. दुर्दैवाने घडलीच तर त्याला जबाबदार कोण याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या काही रहिवाशांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
विभागीय कार्यालय क्रमांक क्रमांक १ क्रमांक २ क्रमांक ३ क्रमांक ४ एकूण
- धोकादायक इमारत संख्या - ०७ १३० १७ १६ १७०
- पाडण्यात आलेल्या इमारती - ०४ ३६ १० ०० ५०
- दुरुस्त झालेल्या इमारती - ०३ ०३ ०२ ०० ०८
- कोर्ट केसेस इमारतींची संख्या - ०० २४ ०० ०३ २७
- उतरविणे बाकी असलल्या इमारती ०० ६७ ०५ १३ ८५
फोटो क्रमांक - ०३०६२०२१- कोल-डेंजर होम