लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:50 PM2023-12-27T12:50:00+5:302023-12-27T12:50:24+5:30

५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्धी

3500 EVMs for Lok Sabha; Preparations on by Kolhapur District Election Department | लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी 

लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी 

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणार असून, त्यावेळी मतदारांचा खरा आकडा कळणार आहे. तत्पूर्वीच निवडणुकीला लागणाऱ्या साहित्यांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मतदानासाठी साडेतीन हजारांवर ईव्हीएम मशिन तयार आहेत, तर नियुक्तीसाठी २६ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

लोकसभेची निवडणूक फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू असलेल्या तयारीला वेग आला आहे. मतदार यादीवर आलेल्या हरकती, अर्जांवर निर्णय घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी होती. ती आता संपली आहे. आता ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतरच्या मतदारांची नावे पुरवणी यादीत प्रसिद्ध होतील. सध्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या स्टेशनरी साहित्यांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

साडेतीन हजारांवर ईव्हीएम मशिन

जिल्ह्यात सध्या ३ हजार ३५९ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी काही मशिनमध्ये बिघाड झाला, तर रिझर्व्ह म्हणून २० टक्के मशिन जास्तीचे ठेवले जातात. विभागनिहाय जास्तीचे मशिन पाठविले जातात. एका मतदान केंद्रावर १ हजार ५०० मतदारांची मर्यादा आहे, त्याहून जास्त मतदार झाले, तर केंद्र वाढवावे लागते. अंतिम मतदार यागी ५ जानेवारीला प्रसिद्ध झाल्यावरच मतदान केंद्रांची संख्या अंतिम ठरेल.

प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांची माहिती

निवडणुकीच्या दृष्टीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनिंग पूर्ण झाले आहे, तसेच अधिकारी, वर्ग २, वर्ग ३ मधील अशा एकूण २६ हजारांवर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यावरच त्यांची नियुक्ती केली जाईल.

मतदारसंघनिहाय जनजागृती

ईव्हीएम मशिनबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी मतदारसंघनिहाय २ वाहने देण्यात आली आहेत. या वाहनात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन असून, नागरिकांना मतदान केल्यानंतर पुढे मशिनमध्ये त्याची प्रक्रिया कशी होते, क्रॉस चेक कसे करता येते, याची माहिती कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. युथ आयकॉन म्हणून वीरधवल खाडे हे नागरिकांना मतदान जागृतीचे आवाहन करणार आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागाची तयारी वेगाने सुरू आहे. मतदार यादी अचूक असावी, यासाठी काटेकोर तपासणी करण्यात आली आहे. दुबार नावे व छायाचित्र असलेल्या मतदारांबद्दलची कार्यवाहीही बीएलओमार्फत केली जात आहे. - समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.
 

Web Title: 3500 EVMs for Lok Sabha; Preparations on by Kolhapur District Election Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.