३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

By इंदुमती सूर्यवंशी | Published: June 2, 2023 01:53 PM2023-06-02T13:53:52+5:302023-06-02T13:54:21+5:30

राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे

350th Shiva Rajabhishek ceremony a year ahead; Which method is this, the question of history researchers | ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

googlenewsNext

इंदुमती गणेश

कोल्हापूर : पुढच्यावर्षी मेमध्ये लोकसभा निवडणूक, राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे. आजवरच्या इतिहासात कोणत्याही महापुरुषांची जयंती, राज्याभिषेक किंवा पुण्यस्मरणाचे कार्यक्रम त्यावर्षीपासून साजरे केले जात असताना यंदा फक्त राजकारणासाठी एक वर्ष आधीच त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणारे सरकारचे गणित कच्चे आहे की मेथड चुकली, अशी विचारणा इतिहास संशोधकांनी केली आहे.

स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिन. यादिवशी स्वराज्याला, रयतेला राजा मिळाला म्हणूनच दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या जल्लोषात रायगडावर साजरा होतो. त्यासाठी हजारो मावळे रायगडावर दाखल होतात. यंदाचा हा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन असताना शासनाकडून ३५०वा सोहळा म्हणून चुकीचे मार्केटिंग केले जात आहे.

६ जूनला काय करणार?

दरवर्षी ६ जूनला हा सोहळा होत असतो; पण आज शुक्रवारी पंतप्रधानांची वेळ आहे म्हणून तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. मग ६ जूनला काय करणार? दाेन वेळा शिवराज्याभिषेक करणार का? हे प्रश्न आहेत. हा सगळा खटाटोप फक्त पुढच्यावर्षीच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याने इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये असंतोष आहे.

ही कुठली पद्धत म्हणायची?

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. तेव्हापासून २०२३ पर्यंतची तारीख विचारात घेतली तर यंदाचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन आहे. पुढच्यावर्षीचा म्हणजे २०२४ सालचा शिवराज्याभिषेक दिन ३५०वा असणार आहे.

याआधीचे महापुरुषांचे उत्सव

  • शिवराज्याभिषेक दिनाचा त्रिशतकोत्सव १९७४ साली साजरा झाला. त्यावेळी रायगडावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्या होत्या. कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणुका निघाल्या होत्या. शासनाच्या लोकराज्य मासिकामध्ये याची छायाचित्रे व वर्णन आहे.
  • शिवाजी महाराजांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव १९२७ साली साजरा झाला.
  • शिवाजी महाराजांचा ३००वा पुण्यस्मरण १९८० साली झाला.
  • राजर्षी शाहू महाराजांचा जन्मशताब्दी उत्सव १९७४ साली झाला.
  • शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष ६ मे २०२२ साली सुरू झाले व २०२३ साली संपले.

राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी ३४९व्या शिवराज्याभिषेक दिनाचा, इतिहासाचा सरकारकडून खेळखंडोबा केला जात आहे. हा प्रकार म्हणजे बाळ जन्मण्याआधीच त्याचा वाढदिवस करण्याचा, इतिहास संशोधकांना, दिग्गज मंडळींना नालायक ठरवण्याचा प्रयत्न आहे. शिवप्रेमींनी चुकीच्या गोष्टींमागे फरफटत न जाता, डोळसपणे याचा विचार करावा. -इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर.

Web Title: 350th Shiva Rajabhishek ceremony a year ahead; Which method is this, the question of history researchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.