‘एमपीएससी’ च्या परिक्षेला कोल्हापुरातील तब्बल ३५३२ उमेदवार गैरहजर!
By संदीप आडनाईक | Published: April 30, 2023 07:28 PM2023-04-30T19:28:47+5:302023-04-30T19:29:11+5:30
जिल्ह्यातील ७१ केंद्रांमध्ये १९,१७० उमेदवारांनी दिली परीक्षा
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी रविवारी कोल्हापुर जिल्हयातील ७१ उपकेंद्रांमध्ये घेण्यात आलेली ही परीक्षा १९ हजार १७० उमेदवारांनी दिली. तब्बल ३ हजार ५३२ उमेदवार या परिक्षेला गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली.
कोल्हापूर शहरातील ७१ उपकेंद्रांमध्ये सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘एमपीएससी’ची परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी जिल्हयातील एकूण २२ हजार ७०२ उमेदवार बसले होते. त्यापैकी १९ हजार १७० उमेदवारांनी परीक्षा केंद्रांमध्ये उपस्थित राहून परीक्षा दिली. ही टक्केवारी ८४.४४ इतकी होती. उर्वरित ३ हजार ५३२ उमेदवार मात्र परिक्षेला गैरहजर होते.
या परिक्षेसाठी ७१ केंद्रप्रमुखांसह १०२५ समवेक्षक, ३७७ पर्यवेक्षक आणि १८ समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. एकूण २२९३ अधिकारी आणि ५६० चतुर्थ श्रेणी कर्मचारी या परीक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक म्हणून भगवान कांबळे यांनी काम पाहिले. तीन भरारी पथकांनी काही परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.
परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम
परीक्षा कालावधीत पोलीस विभागामार्फत परीक्षा केंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त होता. परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार होऊ नये व परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-ब सेवा संयुकत पुर्व परीक्षा- २०२३
एकूण उपकेंद्र संख्या : ७१
एकूण परीक्षार्थी : २२७०२
उपस्थित परीक्षार्थी : १९१७०
टक्केवारी : ८४.४४ %
अनुपस्थित परीक्षार्थी : ३५३२
एकूण समन्वय अधिकारी : १८
एकूण भरारी पथक : ०३
एकूण नियुक्त अधिकारी व कर्मचारी : २२९३
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"