ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांना ३५८ कोटींच्या खंडणीचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:05+5:302021-03-31T04:25:05+5:30
शरद यादव लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इंधन दरवाढीने वाढलेले मशागतीचे दर, रासायनिक खतांच्या दरातील जबरी वाढ, पुराच्या तडाख्याने ...
शरद यादव
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इंधन दरवाढीने वाढलेले मशागतीचे दर, रासायनिक खतांच्या दरातील जबरी वाढ, पुराच्या तडाख्याने बुडालेली शेती, महागाई वाढल्याने मजुरीचे वाढलेल दर, यामुळे मेटाकुटीला आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात तोडणीसाठी खुशालीच्या नावाखाली तब्बल ३५८ कोटी ८७ लाख रुपयांचा चुना लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, १ कोटी ४३ लाख ५५ हजार टनाचे गाळप झाले आहे. कोयता लावायचा असेल तर किती देणार बोला, अशी अनिष्ट पद्धत जिल्हाभर फोपावली असून, याला वेळीच ब्रेक लागला नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘बडा घर, पोकळ वासा’ अशी होण्यास वेळ लागणार नाही.
यंदा मजुरांची कमतरता आहे त्यामुळे ऊस वेळेत ताेडणे अवघड होईल, अशी हाकाटी हंगामाच्या सुरुवातीलाच ठोकण्यात आल्याने व कारखानदारांनी याकडे कानाडोळा केल्याने तोडणीवाल्यांचे चांगलेच फावल्याचे चित्र होते. त्यातच कारखान्यांची क्रमपाळी पत्रकाला ट्रॅक्टर मालक व चिटबॉय यांनी संगनमताने कात्रजचा घाट दाखविल्याने खुशालीची खंडणी केव्हा झाली, हे शेतकऱ्यांनाच कळले नाही. सुरुवातीला एकरी ३ हजार, नंतर ५ हजार व शेवटी तर १० हजारांपर्यंत हा खंडणीचा दर गेल्याने व आपली तक्रार कोणी ऐकूनच घेत नसल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांचा नाइलाज झाला. रोज तोडकऱ्यांना चहाबरेाबर बिस्कीट, तोडणीचे पैसे अगोदरच, तोडणी संपल्यावर एखादे जेवण, असा सारा खुशी खुशी खंडणीचा मामला जिल्हाभर सुरू झाला. यातून शेतकऱ्यांचा ३५८ कोटी रुपयांचा खिसा मारल्याचे पुढे आले आहे.
कोठूनही व कसाही आणा, पण ऊस आणा, असा विश्वामित्री पवित्रा बहुतेक सर्वच कारखानदारांनी घेतल्याने लुटणाऱ्यांचे आयतेच फावल्याचे दिसून येते. या लुटीच्या गँगमध्ये यापूर्वी गावातील ऊसतोड करणाऱ्या मजुरांचा सहभाग कमी असायचा. मात्र, यंदा त्यांनीही यात मागे न राहता वाहत्या गंगेत हात धुऊन घेतल्याचे पाहायला मिळाले.
खंडणीचा हा कर्करोग वेळीच थांबवला नाही, तर ऊस शेती परवडणार नाहीच, तसेच ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
...........
मशीनवालेही लागले लुटायला..
यंदा मजूर कमी आहेत म्हणून शेतकऱ्यांनी मशीनने ऊस तोडणीला प्राधान्य दिले; परंतु तेथेही काही संत असल्याचे चित्र नव्हते. रोज ५ ते ६ माणसांचे जेवण द्याच, त्याबराेबर एकरी दोन हजारही मोजा, असा हेका अनेक ठिकाणी मशीनवरील कर्मचाऱ्यांनी धरल्याने शेतकऱ्यांना ‘बुक्क्याचा मार मुक्याने’ खाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
............
कोट....
उसाला तोड आल्यावर फडकऱ्यांनी गाडीला चारशे रुपये दिल्याशिवाय फडाला हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे नाइलाजास्तव पैसे देऊन ऊस तोडून घेतला. कारखान्याकडून टनाला मिळणारा दर व त्यातून प्रत्येक गाडीमागे दिलेले फडकऱ्यांना पैसे वजा केले, तर टनाला दर किती पडला, याचा विचार करण्याची गरज आहे.
मिलिंद बाळकृष्ण पाटील, शेतकरी, कसबा बावडा.
...............
आतापर्यंत जिल्ह्यात झालेले गाळप
१ कोटी ४३ लाख ५५ हजार टन
प्रतिटनाला तोडणीसाठी बसलेली खंडणी
सुमारे २५० रुपये
यामुळे शेतकऱ्यांना बसलेला भुर्दंड
३५८ कोटी ८७ लाख