साहेबांचा घास मोठा; ३ क्लास टू, १७ क्लास थ्री सापळ्यात!, 'लाचखोरीत' महसूल अव्वलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:41 PM2022-01-11T12:41:22+5:302022-01-11T12:41:42+5:30

तानाजी पोवार कोल्हापूर : गेल्या वर्षभरात २४ सापळ्यात तब्बल ३७ लाचखोरांना बेड्या ठोकण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. विशेष म्हणजे, ...

37 bribe takers were arrested in 24 traps last year In Kolhapur district | साहेबांचा घास मोठा; ३ क्लास टू, १७ क्लास थ्री सापळ्यात!, 'लाचखोरीत' महसूल अव्वलच

साहेबांचा घास मोठा; ३ क्लास टू, १७ क्लास थ्री सापळ्यात!, 'लाचखोरीत' महसूल अव्वलच

Next

तानाजी पोवार

कोल्हापूर : गेल्या वर्षभरात २४ सापळ्यात तब्बल ३७ लाचखोरांना बेड्या ठोकण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. विशेष म्हणजे, वर्षभरातील कारवाईतून साहेबांचा लाचखोरीत मोठा घास असल्याचे दिसून आले. २० लाख, ३ लाख, ७५ हजाराची लाच घेणारेही गजाआड डांबले. यामध्ये क्लास टू चे तीन, तर क्लास थ्री चे १७ जण सापळ्यात फसले. दरवर्षीप्रमाणे २०२१ मध्येही महसूल विभागाने आठ कारवाईचे लाचखोरीत अव्वल स्थान कायम राखले, तर नेहमी दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या पोलीस विभागासोबत ऊर्जा विभागानेही मजल मारल्याचे कारवाईवरून स्पष्ट झाले.

शासकीय कार्यालयात लाच घेतल्याशिवाय नागरिकांची कामाची फाईलच पुढे सरकवायची नाही, असा जणू काही अलिखित फतवाच म्हणावा लागेल. प्रत्येक कामात लाखो रुपयांची लाच स्वीकारूनही अशा अधिकाऱ्याचे पोट मात्र कधीही भरत नाही, त्यामुळे एकाकडून लाच घेतल्यानंतर ते दुसरा सावज शोधण्यात गर्क असतात. अशांविरोधात तक्रारीसाठी नागरिकांनी धाडसाने पुढे यावे. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा नेहमीच कारवाईसाठी सज्ज आहे.

लाचखोरांची संख्या घटली, पण हजाराची लाच लाखात पोहोचली

२०२० या वर्षात तब्बल २७ सापळ्यात ४२ जण गजाआड टाकले, त्यामध्ये ३० सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पण २०२१ या वर्षात २४ कारवाई ३७ जणांना गजाआाड डांबले. पण लाचखोरांवर कारवाईची संख्या कमी असली, तरीही लाचखोरांचे घास हे २० लाख, ३ लाख, ७५ हजार असे डोळे दिपवणारे असल्याचे कारवाईतून दिसून आले.

अबब! ४० लाखांची मागणी, २० लाखांची लाच स्वीकारली

फेब्रुवारी २०२१ मध्ये नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार (वर्ग २) गणेश माने याने एका कामात तब्बल ४५ लाखांच्या लाचेची मागणी केली, त्यापैकी २० लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. कोल्हापूरच्या इतिहासातील सर्वांत मोठी लाचेची कारवाई नोंदवली. पाठोपाठ ऑगस्टमध्ये महसूल विभागातील एका कामासाठी १२ लाख रुपये लाचेची मागणी झाली, तडजोड अंती ५ लाख देण्याचे ठरले, त्यातील पहिला हप्ता ३ लाखांची लाच स्वीकारताना हातकणंगले येथे तिघे खासगी इसम पथकाच्या जाळ्यात अडकले.

सरकारी कार्यालयात लाच घेतल्याशिवाय काम न करणाऱ्याविरोधात तक्रारदाराने थेट तक्रार १०६४ या टोल फ्री नंबरवर करावी. त्यासाठी तक्रारदाराने कार्यालयात येण्याची गरज नाही, तक्रारदाराचे कामही थांबणार नाही. फक्त तक्रारदाराने निर्भयपणे तक्रारीसाठी पुढे यावे - आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.

 

विभाग : २०२१ - २०२०

महसूल : ०८ - ०७

पोलीस : ०५ - ०६

उद्योग व ऊर्जा : ०५ - ०३

नगरविकास : ०२ - ०१

आरोग्य : ०१ - ०२

जिल्हा परिषद: ०० - ०३

सार्वजनिक बांधकाम : ०१ - ००

Web Title: 37 bribe takers were arrested in 24 traps last year In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.