पन्हाळ्यावर निरीक्षणात आढळल्या ३७ पक्ष्यांच्या प्रजाती, बर्डस ऑफ कोल्हापूरच्या हिवाळी मोहिमेस प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:01 PM2022-11-08T19:01:52+5:302022-11-08T19:02:08+5:30
आठ स्थलांतरित, दोन स्थानिक स्थलांतरित आणि २७ रहिवासी पक्ष्यांच्या एकूण ३७ प्रजातींची नोंद
कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे बर्ड्स ऑफ कोल्हापूर या कोल्हापुरातील पक्षिप्रेमी संस्थेने पक्षी सप्ताहात पक्षी निरीक्षणाच्या हिवाळी मोहिमेची सुरुवात केली आहे. पन्हाळगडावरील पक्षी निरीक्षणात निरीक्षकांना आठ स्थलांतरित, दोन स्थानिक स्थलांतरित आणि २७ रहिवासी पक्ष्यांच्या एकूण ३७ प्रजातींची नोंद करता आली. सामान्यत: या महिन्यात दरवर्षी बाहेरून येणारे पक्षी अद्याप आढळले नसल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले आहे.
आरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसापासून म्हणजे ५ नोव्हेंबरपासून बर्डमॅन ऑफ इंडिया सलीम अली यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे १२ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रभर ‘पक्षी सप्ताह’ सर्व निसर्गप्रेमी अतिशय उत्साहाने साजरा करतात. यानिमित्ताने बर्ड्स ऑफ कोल्हापूर या संस्थेने पक्षी निरीक्षणाच्या हिवाळी मोहिमेची सुरुवात केली आहे. या पक्षी निरीक्षणाची सुरुवात पन्हाळा गडावरील तबक उद्यानातून करण्यात आली. संस्थेचे प्रणव देसाई, सतपाल गंगनमाले, अभिषेक शिर्के आणि पृथ्वीराज सरनोबत यांनी या निरीक्षणात सहभाग घेतला.
पक्ष्यांच्या ३७ प्रजातींची नोंद :
- - स्थलांतरित ८
- - स्थानिक स्थलांतरित २
- - रहिवासी २७
हे पक्षी आढळले :
- स्थलांतरित पक्षी : बुटेड वॉब्लर, ब्लिथस् रीड वॉब्लर, ग्रीन वॉब्लर, व्हरडीटर फ्लायकॅचर, ब्लू कॅप रॉकथ्रश, कॉमन रोजफींच, फॉरेस्ट वॅगटेल, ऍशी ड्रोंगो
- स्थानिक स्थलांतरित पक्षी : इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचर आणि व्हाइट रंप शामा.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा वातावरण बदल, आधुनिक विकासासाठी चालू असलेल्या मानवी हस्तक्षेपाचे परिणाम पक्ष्यांच्या आढळावर दिसून येत आहेत. पक्षी निरीक्षण म्हणजे एक प्रकारचे मेडिटेशन आहे. यामुळे तणावमुक्त व उत्साही राहता येते. - प्रणव संजय देसाई, पक्षी निरीक्षक.