गैरसोयींमुळे ३७ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर जाण्यास पसंती
By admin | Published: December 12, 2014 11:25 PM2014-12-12T23:25:47+5:302014-12-12T23:37:26+5:30
समायोजन सुरळीत : सन २०१३ नुसारच प्रक्रिया पूर्ण; शिक्षक संघटनांचा मात्र विरोध
कोल्हापूर : उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने येथील मेन राजाराम हायस्कूल येथे आज, शुक्रवारी शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली. २०१४ च्या पटसंख्येनुसार समायोजन करावे, ही संघटनेची मागणी झुगारून प्रशासनाने ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येनुसार ६७ रिक्त जागांसाठी समायोजन प्रक्रिया राबवली. यावेळी जिल्ह्याबाहेर जाण्यास तयार असल्याचे ३७ शिक्षकांनी लेखी दिले. परिणामी, सर्व रिक्त जागा न भरल्याने पुन्हा समायोजनाची प्रक्रिया राबवावी लागेल.
हक्काचे शिक्षण कायद्यानुसार ३० सप्टेंबर २०१३च्या पटसंख्येवर आधारित २४ जून २०१४ पासून अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू केली. ती १९ आॅगस्ट २०१४ पर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली. नंतर अतिरिक्त अध्यापकांची समायोजन प्रक्रिया सुरू झाली. यावेळी शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना ‘अतिरिक्त’च्या प्रक्रियेतून वगळले. मात्र, उपाध्यक्षांना न वगळल्याने एका शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दावा दाखला केला. यामुळे न्यायालयाने दिलेली समायोजनाची स्थगिती मुंंबई उच्च न्यायालयाने उठविल्यामुळे आज समायोजनाची प्रक्रिया राबविली. आज अतिरिक्त असलेल्या २४२ अध्यापकांना समायोजनासाठी निमंत्रित केले होते.
दरम्यान, सहा डोंगराळ तालुक्यांत ८७ रिक्त पदे आहेत. यामधील २०१३ च्या पटसंख्येवर आधारित ६७ रिक्त जागांवर समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली. सन २०१३च्या पटसंख्येनुसार रिक्त असलेल्या पूर्ण ६७ रिक्त जागांवरील समायोजन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांसाठी २०१४ च्या पटसंख्येवर आधारित समायोजन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
स्थगिती उठवल्यामुळे समायोजनाची प्रक्रिया २०१३ च्या पटसंख्येनुसार पूर्ण केली. समायोजनावेळी ३७ जणांनी पसंतीप्रमाणे शाळा न मिळाल्यामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यास तयार असल्याचे लेखी दिले आहे. यामुळे रिक्त जागांवर पुढील टप्प्यात समायोजनाची प्रक्रिया राबवण्यात येईल. २०१३ च्या पटसंख्येनुसार समायोजन पूर्ण झाल्यानंतरच २०१४ च्या पटसंख्येनुसार समायोजन होईल.
- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
२०१४ नुसार समायोजनासाठी बेमुदत उपोषणाचा इशारा
कोल्हापूर : अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सन २०१४-१५ च्या संच मान्यतेनुसार करावे, या मागणीसाठी गुरुवार (दि. १८) पासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे एका निवेदनाद्वारे प्राथमिक शिक्षण प्रशासनाला दिला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे सन २०१३-१४ चे प्रतीकात्मक समायोजन करून २०१४-१५ नुसार प्रत्यक्षात समायोजन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असताना प्राथमिक शिक्षण प्रशासनाने आज, शुक्रवारी २०१३-१४ सालातील समायोजन प्रक्रिया प्रत्यक्षात राबविली. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गैरसोयींमुळे ३७ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर जाण्यास पसंती