कोल्हापुरात कोरोना लसीचे ३७ हजार डोस झाले मुदतबाह्य, नव्याने २० हजार डोसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:08 PM2022-12-28T17:08:23+5:302022-12-28T17:08:47+5:30
बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांची टाळाटाळ
कोल्हापूर : कोरोनाचे गांभीर्य संपल्यानंतर बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील ३७ हजार डोस ३१ डिसेंबर २०२२ रोजी मुदतबाह्य होणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मागणी वाढणार आहे हे लक्षात घेऊन नव्याने कोविशिल्डच्या २० हजार डोसची मागणी नोंदवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ३३ लाख ४३ हजार ४९० नागरिकांनी पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे हे नियोजन करण्यात आले होते. यातील पात्र ९० टक्के नागरिकांना पहिला डोस, तर ८० टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. मात्र, केवळ पाच टक्के नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला.
आता कोरोनाचा कहर पुन्हा काही देशांमध्ये सुरू झाल्यामुळे लसीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नागरिक बूस्टर डोससाठी चौकशी करत आहेत. परंतु, ३१ डिसेंबरच्या आतच हा डोस घ्यावा लागणार आहे. कारण त्यानंतर सर्व डोस मुदतबाह्य होणार आहेत. यानंतर नागरिकांनी पुन्हा डोस मागितल्यास गैरसोय नको म्हणून नव्याने २० हजारची मागणी नोंदवण्यात आली असून, नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात हे डोस उपलब्ध होणार आहेत.
जनजागरण आवश्यक
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेताना आरोग्य विभागातील कर्मचारीही टाळाटाळ करत होते ही वस्तुस्थिती होती. परंतु, जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने याबाबत जनजागरण करून लसीकरणाची टक्केवारी वाढवली. मात्र, बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांनी टाळाटाळ केली. आता जरी काही डोस मुदतबाह्य होणार असले, तरी २० हजार कोविशिल्डची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे नागरिकांना नव्या वर्षात हा डोस उपलब्ध होईल.