‘धान्य व्यापारी मंडळाची विद्यायक कामांची ३७ वर्षे---विधायक गणेशोत्सव -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 08:12 PM2017-09-02T20:12:53+5:302017-09-02T20:18:33+5:30
श्रद्धेला विधायक कामाची जोड देऊन लक्ष्मीपुरी येथील कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची गेली ३७ वर्षे अविरतपणे घोडदौड सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क राजाराम लोंढे, कोल्हापूर : श्रद्धेला विधायक कामाची जोड देऊन लक्ष्मीपुरी येथील कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची गेली ३७ वर्षे अविरतपणे घोडदौड सुरू आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आधार दिला जातोच; पण नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वांत पुढे जाऊन हात देण्याचे काम मंडळ हिरीरिने करीत आहे.धान्य व्यापारी मंडळाची १९८० ला स्थापना झाली आणि दहीहंडी कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन व्यापाºयांनी घेतला. केवळ मूर्ती प्रतिष्ठापणा न करता त्यातून विधायक काम उभे करण्याचा संकल्प त्यावेळी करण्यात आला. गेली ३७ वर्षे या मार्गाने मंडळाची वाटचाल सुरू राहिली आहे. दरवर्षी महाप्रसाद घातला जातो. अनंत चतुर्दशीच्या अगोदर तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मुगडाळ व तांदळाची तुपात शिजविलेली खिचडी भाविकांना दिली जाते. पोटभर खिचडी दिली जातेच; पण त्याबरोबर प्रत्येकाला बाटली बंद पाणी पिण्यासाठी पुरविले जाते. महाप्रसादाचे वाटप करून मंडळ थांबले नाही, तर जिल्'ात असो किंवा जिल्'ाबाहेर कोठेही नैसर्गिक आपत्ती आली, तर मंडळ सर्वांत पुढे असते. कोल्हापुरात २००५ साली आलेल्या महापुरावेळी अनेक कुटुंबे विस्थापित झाली होती. काही कुटुंबे दसरा चौकातील मठात राहिली होती. या कुटुंबांच्या जेवणाची व्यवस्थाही मंडळाने केली होती. एवढ्यावरच न थांबता समाजातील जे जे लोक मदतीसाठी येतील त्यांना सढळ हाताने मदत करण्याचे काम मंडळाने केले आहे.
समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश व शालेय साहित्याचे वाटप केले जाते. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सामान्य माणसांना आरोग्य तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बहुतांशी मंडळे, ट्रस्ट असे उपक्रम राबवितात; पण या शिबिराच्या माध्यमातून दुर्दम्य आजार निदर्शनास आला आणि तातडीने आॅपरेशन करणे गरजेचे असल्यास मंडळ स्वत: पुढाकार घेऊन पुढील उपचार करते.
लातूर भूकंपावेळी सर्वांत पहिली मदत
लातूर जिल्'ात झालेल्या भूकंपावेळी सर्वांत पहिल्यांदा मंडळाने मदत पोहोच केली होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लातूरमधील २२ गावांत जाऊन तीन ट्रक धान्याचे वाटप केले होते.
शिस्तबध्द मिरवणुकीबद्दल पारितोषिक
गणेश आगमन व विसर्जनावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांची शिस्त वाखण्यासारखी असते. विसर्जन मिरवणूक अगदी शिस्तबद्ध काढली जाते. त्याची दखल घेऊन पोलीस विभागाने मंडळाचा दोनवेळा पारितोषिक देऊन गौरव केला आहे.
या संस्थांचाही हातभार!
कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळ सामाजिक कामातच पुढे नाही, तर कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन व कोल्हापूर बालकल्याण संस्थेच्या माध्यमातून मोठे भरीव काम उभे केले आहे.
अशी आहे कार्यकारणी-
गणेश सन्नकी (अध्यक्ष), शिवाजी यादव (उपाध्यक्ष), धमेंद्र नष्टे (सचिव), संजय खोत, राजेश आवटे, सतीश खोत (सदस्य).
गेल्या ३७ वर्षांची विधायक कामांची परंपरा आम्ही आजही जोपासली आहे. आगामी काळातही वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.
-गणेश सन्नकी (अध्यक्ष, धान्य व्यापारी मंडळ)