ऊस खरेदीकर माफीमुळे ३७२ कोटींचा फायदा
By admin | Published: March 19, 2017 12:34 AM2017-03-19T00:34:00+5:302017-03-19T00:34:00+5:30
अर्थसंकल्पातील तरतूद : कारखानदारांना दिलासा
कोल्हापूर : राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन वर्षांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील साखर कारखान्यांना ३७२ कोटींचा फायदा होणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अपुऱ्या ऊस उत्पादनाने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मागील दोन वर्षांतील उसाच्या उत्पादनाची तुलना केली, तर केवळ ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर, सांगलीचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम जेमतेम दोन महिनेच चालला. उसाच्या तुटवड्यामुळे हंगाम अडखळत चालला. परिणामी, कारखान्यांच्या उत्पादन खर्चात प्रतिटन २५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका बसला.
अशा परिस्थितीतून कारखान्यांना सावरण्यासाठी ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हंगाम २०१५-१६ व २०१६-१७ असा दोन वर्षांचा खरेदीकर माफ केला आहे.
मागील हंगामाचा विचार करायचा झाल्यास राज्यात ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले. साधारणत: प्रतिटन १०० रुपये खरेदीकर माफ झाला, तर कारखान्यांना ३७२ कोटींची मदत होणार आहे. यंदाचे साखर उत्पादन व शिल्लक साखरेचा ताळमेळ घातला तर पुरेशी साखर आहे. आगामी काळात साखर आयातीबाबत राज्य सरकारने निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा साखर कारखानदारांकडून व्यक्त होत आहे.
निर्यातीची अट शिथिल
साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांचा खरेदीकर माफ करण्याची अट होती; पण अर्थसंकल्पात निर्यातीची अट शिथिल केली असून, त्याचा फायदाही कारखान्यांना होणार आहे.
ऊस खरेदीकर माफ करून सरकारने कारखान्यांना दिलासा दिला आहे. सध्या बाजारात साखरेचे दर चांगले आहेत; पण साखर आयातीबाबत सरकारचे धोरण असेच कायम पाहिजे. आयात शुल्क कमी केले तर पुन्हा दरावर परिणाम होईल.
- पी. जी. मेढे (साखर तज्ज्ञ)
विभागाला दीडशे कोटींचा फायदा
कोल्हापूर विभागात यावर्षी एक कोटी ५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस खरेदीकर माफीचा फायदा विभागाला साधारणत: दीडशे कोटी रुपये होऊ शकतो. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे शंभर कोटी रुपये करमाफीतून मिळू शकतात. सांगली जिल्ह्यात ५० लाख ३४ हजार ४५९ टन गाळप झाला असल्याने सुमारे ५० कोटी रुपयांचा लाभ या जिल्ह्यातील कारखान्यांना होणार आहे.