नव्या आर्थिक वर्षात दलित वस्तीमधून ३८ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:24 AM2021-05-22T04:24:01+5:302021-05-22T04:24:01+5:30
कोल्हापूर : नव्या आर्थिक वर्षासाठी दलित वस्तीसाठी ३७ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी निश्चित ...
कोल्हापूर : नव्या आर्थिक वर्षासाठी दलित वस्तीसाठी ३७ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हा परिषदेला हा निधी देण्यात येतो; मात्र अजूनही गेल्या वर्षीच्याच कामांना सुरुवात झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
गेल्या वर्षी याच योजनेतून ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, कोणाला किती निधी यावरून पदाधिकाऱ्यांमध्येच वाद रंगला. शेवटी हा प्रश्न पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर गेला. तिथेही समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने यांनी जादा निधीसाठी आग्रह धरला. या सर्व घोळात तीन महिने गेले.
नुकत्याच झालेल्या स्थायी समितीमध्ये सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी दलित वस्तीच्या निधीच्या कामांची अंदाजपत्रके न मागवता याद्यांना मंजुरी देण्याचा आग्रह धरला. वास्तविक सुचवलेल्या कामांची अंदाजपत्रके आल्याशिवाय प्रशासकीय मान्यता देता येत नाही. परंतु, सुरुवातीला कठोर भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांनीही नंतर शासकीय प्रक्रिया बाजूला ठेवून या कामांच्या याद्यांना प्रशासकीय मान्यता देऊन टाकली आहे. यासाठी ग्रामपंचायत विभागाने अशाच याद्यांना मान्यता दिल्याचा दाखला दिला जात आहे.
चौकट
तालुकावार कामे
करवीर १६९
पन्हाळा ६७
राधानगरी ४९
शाहूवाडी ४४
शिरोळ ११३
कागल ६३
हातकणंगले १५३
गगनबावडा २४
चंदगड २९
आजरा १९
गडहिंग्लज ६१
भुदरगड ३७