Kolhapur: किणी नाक्यावर ३८ गावांना मिळणार टोलमाफीचा लाभ, काँग्रेसच्या आंदोलनाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 03:47 PM2024-08-05T15:47:23+5:302024-08-05T15:47:44+5:30
संतोष भोसले/आयुब मुल्ला किणी/खोची : काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर किणी टोलनाका परिघाच्या २० किलोमीटर अंतरातील गावांत टोलमाफीचा पास मिळणार, हा ...
संतोष भोसले/आयुब मुल्ला
किणी/खोची : काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर किणी टोलनाका परिघाच्या २० किलोमीटर अंतरातील गावांत टोलमाफीचा पास मिळणार, हा मुद्दा ठळकपणे चर्चेत आला आहे. सुमारे ३८ गावांतील वाहनचालकांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ओळख सांगून टोलमाफी मिळविणाऱ्या वाहनधारकांची संख्या अत्यल्प होती. आता संबंधित परिघातील वाहनमालकांना टोलमाफीचा अधिकार मिळणार आहे.
याची विचारपूस करण्यासाठी टोल नाक्यावर गर्दी होत आहे. हक्काचा लाभ घेणाऱ्यांची संख्या आता हजारोंच्या घरात पोहोचणार आहे.
महामार्गावरील निकृष्ट रस्त्याच्या कामावरून शनिवारी हातकणंगले तालुक्यातील किणी टोलनाक्यावर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रखर आंदोलन झाले. यातूनच पंधरा दिवसांत सेवा रस्ते दुरुस्त करणार, २५ टक्के टोलमाफी असलेल्या धोरणात अजून २५ टक्के वाढ करण्यासाठी पाठपुरावा करणार आणि २० किलोमीटर परिघातील वाहनमालकांना टोल माफी दिली जाणार, अशा आश्वासनाचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिले.
यामुळे परिसरातील गावांमध्ये टोलमाफीच्या प्रबोधनाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. हा विषय आतापर्यंत माहीतच नव्हता आम्ही टोल देऊनच पुढे जात होतो. बरं झालं आपल्या अधिकाराची जाणीव झाली. आता मात्र याचा लाभ घ्यायचा, अशा चर्चा सुरू आहेत. याची माहिती घेण्यासाठी टोल नाक्यावर लोकांनी धाव घेतली.
मुळातच राज्य रस्ते विकास महामार्गाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता जानेवारी २०२३ मध्ये हस्तांतरित झाला. त्यानंतर सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. त्यावेळेस टोल दर लागूची अधिसूचना जाहीर झाली. त्यामध्ये स्थानिक वाहनांना माफी देण्याचा उल्लेख आहे. म्हणजे हा निर्णय होऊन तब्बल १८ महिने झाले. परंतु याबाबत कोणाला माहिती नव्हती. पात्र असूनही टोल देत आल्याची भावना लोक व्यक्त करू लागले आहेत. अधिकाराची जाणीव करून देण्याची भूमिका पार पाडण्यात आली असती, तर लोकांना त्यांच्या अधिकाराचा फायदा मिळाला असता. परंतु उशिरा का होईना हक्काची टोलमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पासमुळे मोठी आर्थिक बचत
टोलमाफीसाठी ३१५ रुपये भरून महिन्याचा पास मिळणार आहे. यासाठी टोल नाक्याच्या कार्यालयात आधार कार्ड व वाहनासंदर्भात आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. जाण्या-येण्यासाठी ७० रुपये टोल द्यावा लागतो. याचा विचार केला तर पासमुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे.
टोलमाफीस पात्र ३८ गावे
रस्त्याच्या अंतराची अंदाजे मोजमाप पाहता यामध्ये पुढील ३८ गावे पात्र होऊ शकतात. वाठार, अंबप, अंबपवाडी, पाडळी, मनपाडळे, संभापूर, टोप, नागाव, शिरोली, कासारवाडी, हलोंडी, शिये, भुये, मौजे वडगाव, पेठ वडगाव, भादोले, लाटवडे, भेंडवडे, खोची, मिणचे, सावर्डे, नरंदे, बुवाचे वाठार, आळते, तळसंदे, पारगाव, चावरे, नीलेवाडी, वारणानगर, कोडोली तसेच सांगली जिल्ह्यातील कणेगाव, तांदूळवाडी, कामेरी, बहादूरवाडी, माले, शिगाव, बागणी.
यापूर्वी टोलमाफी सवलतीचा लाभ मिळत नव्हता. आंदोलनामुळे स्थानिक वाहनांना पासची सुविधा मिळणार आहे. यामुळे वाहनधारकांचा फायदा झाला आहे. -तानाजी पाटील, सरपंच, टोप
आंदोलन झाले ही प्रवाशांसाठी लाभदायी बाब ठरली आहे. टोल माफी हा विषय सर्वांनाच माहिती नव्हता. गावात याची माहिती सांगण्यासाठी प्रयत्न केले जातील. -अमोल कांबळे, सरपंच, सावर्डे